इगतपुरीनामा न्यूज, दि. ६
आदिवासी अतिदुर्गम असणाऱ्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी बहुसंख्य आदिवासी नागरिकांना आटापिटा करावा लागतो. रोजगाराची भ्रांत असल्याने पाण्यासाठी लांबवर जावे लागुन त्याचा उत्पन्नावर परिणाम होतो. म्हणून आपल्या ग्रामस्थांना पाण्याच्या समस्येपासून मुक्त करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत त्रिंगलवाडी/पारदेवीचे लोकनियुक्त सरपंच अशोक जेठू पिंगळे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्रिंगलवाडी/पारदेवी येथील संपूर्ण वाड्या आणि वस्तीवर राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत नळाद्वारे थेट नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचले आहे. यामुळे वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचित ग्रामस्थांनी सरपंच अशोक पिंगळे यांच्याकडे समाधान व्यक्त केले आहे.
ह्या भागातील लोकांसाठी महत्वपूर्ण असणाऱ्या ह्या पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वास आले आहे. या नळ पाणी पुरवठा योजनेची तपासणी करण्यात आली. संपूर्ण दाबाने पाणी पोहोचल्याने त्रिंगलवाडी व पारदेवी येथील नागरिकांच्या चेहर्यावर आनंद आणि समाधान पसरले आहे. सरपंच अशोक पिंगळे यांच्या प्रयत्नांनी राबवलेल्या योजनेमुळे या भागातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला आहे. या वाड्या-वस्तीवरच्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरला आहे. याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच अशोक जेठू पिंगळे, पाणी पुरवठा अधिकारी सुर्यवंशी, ठेकेदार राम काश्मीर, ग्रामसेविका एस. एस. शिंदे , ग्रामपंचायत सदस्य शंकर पादिर, सुरेश करवर, संपत पिंगळे, दीपक आगीवले, तुळसाबाई आवाली, पोलीस पाटील सुरेश कोकणे आदी सर्वांचे सहकार्य लाभल्याने हे काम पूर्णत्वास गेले असे मत लोकनियुक्त सरपंच अशोक जेठू पिंगळे यांनी व्यक्त केले.