पर्यावरणपूरक शिरसाठे गावाची यशोगाथा १
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २३
इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे हे १ हजार २८० पेक्षा अधिक लोकसंख्या व 255 घरे असलेले पर्यावरण पूरक गांव आहे. गावाला गायरान मुबलक असलेली गायरान जमीन किमान ५० वर्षापासून गुरे चराईसाठी वापरण्यात येत होती. ह्या जमिनीमध्ये आजूबाजूचे शेतकरी बांध कोरून अतिक्रमण करत होते. अशा ओसाड जमिनीकडे कोणाचेही गावकऱ्यांचे लक्ष नव्हते. महाराष्ट्र दिनाच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन ठराव केला. आपल्या गावामध्ये गायरान जमीन ओसाड पडून आहे. आजपर्यंत त्या जमिनींवर कुठल्याही प्रकारचे एकही झाड उगलेले नाही, ह्या जमिनीवर वृक्ष लागवड केल्यास त्याचा हरित आच्छादनासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो. त्या दृष्टीने उपस्थित सभासदांनी ग्रामपंचायतीचा गायरान गट नंबर 475 मधील १० एकर हे वृक्ष लागवडीसाठी चांगले असून तेथे देशी प्रजातीचे व इतर पद्धतीचे वृक्ष लागवड करण्याचा ठराव मंजूर केला. त्यानुसार ह्या ठरावाची अंमलबजावणी करून गट नं. ४७५ मध्ये गावाचे हरित आच्छादान वाढवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना २०२१-२२ अंतर्गत ८ हजार देशी प्रजातीची झाडे लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
ह्यामध्ये केशर आंबा १ हजार ३००, संकरित सीताफळ १ हजार ७००, जांभूळ ५५०, साग ३ हजार, इतर प्रजाती १ हजार ४५० एवढी झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले. एप्रिल व मे महिन्यामध्ये ह्या ठिकाणी लाईन आऊट करण्यात येऊन गावातील उपलब्ध मजूर व महिला बचत गटातील मजूर यांच्यामार्फत वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्यात आले. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये खड्ड्यामध्ये शेणखत टाकून खड्डे बुजवण्यात आले. यानुसार जून महिन्याच्या दुसऱ्या पावसामध्ये वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले. तत्पूर्वी शासकीय नर्सरीतून रोपे खरेदी करण्याबाबत शासन निर्णयानुसार शासकीय नर्सरीमध्ये रोपे उपलब्ध नसल्यामुळे देशी प्रजातीचे वृक्ष खरेदी करण्यासाठी शासनमान्य खाजगी नर्सरीतून रोपे खरेदी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ८ हजार झाडांची लागवड करण्याचे काम १७ जून २०२१ ह्यादिवशी सुरू करण्यात आले. ह्या कामासाठी नरेगा उपायुक्त नाकाडे मॅडम, इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, तत्कालीन सहाय्यक गटविकास अधिकारी भरत वेंदे, ग्रापं विस्ताराधिकारी संजय पवार, कृषी अधिकारी मोगल, गांगोडे कृषी विस्ताराधिकारी देशमुख, मग्रारोहयो कक्ष इगतपुरीच्या सीमा सोनवणे, विजय चव्हाण यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सर्वांना वृक्षलागवडीसाठी प्रोत्साहित केले.
स्थानिक मजुरांमार्फत झाडांची लागवड केलेल्या क्षेत्राचे संरक्षण व संगोपन कसे करायचे याबाबत ग्रामपंचायतीने मासिक सभा घेऊन निर्णय घेतला. ह्या क्षेत्राला नैसर्गिक झाडांचे काटेरी कुंपण करण्यात यावे. काटेरी कुंपण हे योजनेच्या निकषांमध्ये बसत आहे, परंतु काटेरी कुंपण हे जास्त दिवस टिकत नसल्याने झाडांचे देखभाल दुरुस्ती व संगोपन जास्त दिवस होऊ शकत नाही. म्हणून सरपंच गोकुळ सदगीर यांनी सांगितले की, काटेरी तार व लोखंडी अँगलचे कुंपण करण्यात यावे. यासाठी लागणारा खर्च हा आम्ही ग्रामपंचायत सदस्य यांच्या लोकवर्गणीतून करण्यास तयार आहोत. त्यानुसार त्यांनी लोकवर्गणी जमा करून काटेरी कुंपण लावून झाडांचे संरक्षण व देखभालीसाठी कुंपणाचे काम पूर्ण केले. नोव्हेंबर महिन्यापासून झाडांना पाण्याची आवश्यकता असते. म्हणून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ह्या गटांमध्ये सामुदायिक विहिरीचे काम मंजूर करण्यात आले. विहिरीला लागलेल्या पाण्याचा उपयोग फक्त वृक्ष संवर्धनासाठी असून झाडांची वाढ अतिशय चांगली आहे. करण्यात आलेल्या वृक्षलागवडीच्या कामाचे समाधान हे सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत कमिटी व कर्मचारी यांना मिळत आहे.
ग्रामपंचायतीने लावले झाड.. फळे खातील ग्रामस्थ
लोकसहभागातून गावठाण परिसर व शिरसाठे सप्रेवाडी रस्त्याच्या दुतर्फा १ हजार शोभिवंत वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ह्या झाडांचे संगोपन करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाठे येथील एका विद्यार्थ्याला एक झाड दत्तक देण्यात आले. संबंधित विद्यार्थी दररोज दत्तक झाडांना पाणी टाकून संगोपन करत आहेत. राबवलेल्या ह्या उपक्रमाबाबत ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळा शिरसाठे येथील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांचे विशेष कौतुक केले. पूर्ण केलेल्या कामाबाबत गावकरी असे म्हणतात की, यापूर्वी एक म्हण होती आजोबांनी झाड लावले. त्याचे फळ नातवाने खाल्ले. परंतु आता ग्रामपंचायतीने फळ झाड लावले व त्याचे फळ हे गावाने खाल्ले अशी नवीन म्हण तयार होत आहे.
वृक्ष लागवडीचे हे आहेत खरे शिलेदार
ग्रामसेवक हनुमान दराडे, सरपंच गोकुळ सदगीर, उपसरपंच शीतल विलास चंदगीर, ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर सोपनर, रमेश शिद, तारा गणेश तेलंग, अलकाबाई दोंदे, गणेश तेलंग, विलास चंदगीर, रामदास सदगीर, भावराव गांगुर्डे, ग्राम रोजगारसेवक भास्कर सदगीर, पाणी पुरवठा कर्मचारी संपत सप्रे, संगणक ऑपरेटर रामचंद्र म्हसणे, राखणदार नामदेव सदगीर, काशिनाथ सोपनर, सर्व ग्रामस्थ आणि शिक्षक.
Comments