इगतपुरीनामा न्यूज, दि. १२
महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी इंग्रजी, हिन्दी भाषेवर प्रभुत्व संपादन करून व्यवसाय व नोकरीच्या विविध संधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. परिसर मुलाखतीच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपले कौशल्य सादर करण्याचे कार्य करावे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी केले. इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मुंबई येथील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ इन्फरमेशन अँड टेक्नॉलॉजी मार्फत आयसीआयसीआय बँकेत नोकरीसाठी आयोजित परिसर मुलाखतीच्या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. भाबड बोलत होते.
कार्यक्रमाला एनआयआयटी मॅनेजर आशिष राऊत, डेव्हलपमेंट ऑफिसर प्रतिक कळवणकर, गौरव गीत, तमन्ना मॅडम, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, प्रा. जी. एस. लायरे, प्रा. जी. टी. सानप, प्रा. डी. के. भेरे, प्रा. ए. बी. घोंगडे, प्रा. जी. डब्ल्यू. गांगुर्डे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. भाबड आपल्या भाषणात पुढे म्हणाले की युवकांनी विविध कौशल्य विकसित करून स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे राहण्यासाठी सक्षम होणे आवश्यक आहे. याप्रसंगी परिसर मुलाखतीच्या माध्यमातून आयसीआयसीआय बँकेत महाविद्यालयातील नोकरीला लागलेले माजी विद्यार्थी वैभव परदेशी व ऋतुजा आव्हाड यांनी आपले अनुभव विशद केले. सारिका पाळदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वैभव शिंदे यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी उपस्थित होते.