इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ ( निफाड न्यूजच्या सौजन्याने )
विधिलिखित टाळता येत नाही,असं म्हणतात. कपाळावर सटूबाईने अदृश्य जीवन लिहिलेलं असतं असा ग्रामीण भागात समज आहे. दैवापुढे कोणाचेच चालत नाही. जीवनगाडे रेटत असतांना अवेळीच जीवनरेषा खंडित झाली तर माणसाकडे उरते फक्त हळहळ..…तळमळ…..गेलेल्याच्या आठवणी..…मृत व्यक्तीच्या आठवणींची संगत..…असिमीत असं ते दुःख असतं. ते दुःख कोणीच वाटून घेऊ शकत नाही. त्यात एकाच दिवशी मातृवियोग आणि पुत्रवियोग नशिबी आलेल्या पिता अन मातेचे दुःख किती खोल असेल याची मोजदाद करताच येणार नाही. निफाड तालुक्यातील देवगाव येथील संतोष बोचरे यांच्या कुटुंबात ही घटना घडली आहे. सकाळी आईचा अंत्यसंस्कार पार पडला आणि सायंकाळी मुलाचा अंत्यसंस्कार होतांना बघण्याची दुर्दैवी वेळ बोचरे कुटुंबावर ओढवली.
देवगाव येथील जगदंबा ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संचालक संतोष जगन्नाथ बोचरे हे शेती व्यवसाय करतात. घरात आई वडील, पती, पत्नी आणि दोन मुले असे त्यांचे कुटुंब आहे. पैकी त्यांच्या मातोश्री द्रोपदाबाई जगन्नाथ बोचरे ( वय ८३ ) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांचा अंत्यविधी सकाळी पार पडला. त्यानंतर बोचरे कुटुंबियांच्या दुःखाच्या घरी भाऊबंद यांनी जेवणे केली. या वेळी बोचरे यांची मुले शैलेश आणि रोशन काम करण्यात व्यस्त होते. अंत्यविधीच्या धावपळीत पाळीव शेळ्यांकडे दुर्लक्ष झाले होते. ते शैलेशच्या लक्षात आले. बोचरे यांच्या घरापासून दोनशे फूट अंतरावर असलेल्या पाण्याचा चर आहे. त्या शेजारील शेवरीच्या झाडाचा पाला आणण्यासाठी शैलेश गेला असता तोल जाऊन चरात पडला. शैलेश पाण्यात पडल्याचे समजताच घरच्यांनी त्यास बाहेर काढले. देवगाव येथील डॉ. किरण पाटील यांच्या समर्थ क्लिनिकमध्ये दाखल केले. तेथून निफाड उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासले असता शैलेश यास मृत घोषित केले. याबाबत लासलगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून सहा.पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस उपनिरीक्षक लहानु धोक्रट, पोलीस नाईक संदीप शिंदे, औदुंबर मुरडनर आदी तपास करत आहेत. शैलेश देवगांव मधील श्री .डी. आर. भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीत होता. कॉलेजवरून आल्यावर शेतीत आई- वडिलांना मदत करत होता. समजदार आणि मनमिळावू, शांत स्वभाव म्हणून गावात ओळखला जायचा. त्याच्या आकस्मित मृत्यूची बातमी धडकताच समाजमन सुन्न झाले. आजी पाठोपाठ नातवाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.