स्टेट बँकेच्या सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊन मुलींचे भविष्य निश्चित करा – सुशील कुमार : अस्वली स्टेट बँकेत विविध कार्यक्रम संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०

भारतीय स्टेट बँकेच्या माध्यमातून लोकांमध्ये सुकन्या समृद्धी योजना अतिशय लोकप्रिय आहे. आपल्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी भारत सरकारच्या सहकार्याने ही योजना सुरू आहे. पालकांनी ह्या योजनेचा लाभ घेऊन मुलींचे भविष्य सुनिश्चित करावे. मुलींना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी अथवा त्यांच्या विवाहासाठी सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन नाशिक विभागीय व्यवस्थापक सुशील कुमार यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील भारतीय स्टेट बँकेच्या अस्वली गोंदे शाखेतर्फे सुकन्या समृद्धी योजनेबाबत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मुली ह्या प्रत्येक घरात लक्ष्मीस्वरूप आहेत. त्यांच्यासाठी स्टेट बँकेने काढलेली योजना प्रत्येक मुलींसाठी प्रत्येक पालकाने घेतल्यास जबाबदारीचे ओझे कमी होण्यास मदत होईल.

शाखाधिकारी नीलिमा वसावे म्हणाल्या की, मुलींचे भविष्य उज्वल होण्यासाठी नेहमीच भारतीय स्टेट बँक लोकांच्या सोबत असते. जागरूक पालकांनी ह्या योजनेचा फायदा करून घेतला असून उर्वरित व्यक्तींनी सुद्धा आपल्या लाडक्या मुलींसाठी ही सर्वोत्तम योजना निवडावी. कार्यक्रमाप्रसंगी चिमुकल्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक मोना गुप्ता, दुसरा क्रमांक श्रावणी नाठे तर तिसरा क्रमांक श्रेया नाठे यांनी पटकावला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी विभागीय व्यवस्थापक सुशील कुमार, शाखाधिकारी नीलिमा वसावे, लक्ष्मण पाळदे, बजरंग भागडे, पूजा राव, रवींद्र नाठे, नामदेव नाठे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. अनेक ग्रामस्थांनी यावेळी सुकन्या समृद्धी योजनेचे फॉर्म भरून उत्तम प्रतिसाद दिला. चिमुकल्या मुलींच्या अभुतपूर्व उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला. कोरोना संबंधी सर्व नियमांचे याप्रसंगी पालन करण्यात आले.

अशी आहे सुकन्या समृद्धी योजना
१) खाते कोण उघडू शकते – ० ते १० वर्ष वयोगटातील मुलींच्या नावाने आई/वडील अथवा कायदेशीर पालनकर्ता
२) किती खाते उघडता येतील – एका मुलीसाठी एक खाते व एक पालक जास्तीत जास्त दोन खाती उघडू शकतात.
३) खाते उघडण्यासाठी आवश्यक कमीत कमी रक्कम रु.२५०/- (खाते उघडल्या नंतर प्रत्येक आर्थिक वर्षात कमीत कमी २५० ,जमा होणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त १ लाख ५० हजार जमा करू शकता ).
४) खात्यामध्ये रक्कम जमा करण्याचा कालावधी – खाते उघडल्या पासून १४ वर्षापर्यंत खात्यात पैसे भरता येते.
५) खात्याचा पूर्ण कालावधी – खाते उघडल्या नंतर २१ वर्षा पर्यंत किंवा मुलीचे लग्नापर्यंत, या पैकी जे आधी होईल तो पर्यंत. परंतु १८ वर्ष वयानंतर तिच्या उच्च शिक्षणासाठी किंवा
लग्नासाठी एकून जमा असलेल्या रकमेतून ५० टक्के रक्कम काढण्याची सुविधा.
६) आयकर सूट – जमा होणारी रक्कम आयकर अधिनियम १९६१ च्या कलम ८०-सी अंतर्गत कर सवलतीस पात्र

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!