डॉ. सौ. दीप्ती देशपांडे, प्राचार्या, एसएमआरके महिला महाविद्यालय, नाशिक
३० नोव्हेंबरला दुपारी ३:५५ मिनिटांनी माझी माय अर्थात आई डॉ. सौ. सुनंदाताई गोसावी हिने ह्या जगाचा निरोप घेतला. आपली आई आता या जगात नाही, हा विचारच मन स्वीकारत नव्हतं. खरं तर वार्धक्य, मरण हे कुणाला चुकत नाही. तुकोबाही म्हणतात त्याप्रमाणेच तुका म्हणे एका मरणची सरे , उत्तमची उरे कीर्ती मागे..अशा ओळी सार्थ करणारी माझी आई तिच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यामुळे सर्वांच्या स्मरणात राहील. माझ्या आईने लग्नानंतर आपले शिक्षण पारिवारीक जबाबदाऱ्या सांभाळत पूर्ण केले. ती मराठी विषयात एमए झाली. थोर साहित्यिक गं. बा. सरदार यांच्या साहित्यावर संशोधन करुन पीएचडीची सन्माननीय पदवी तिने प्राप्त केली. तिने महिला शिक्षणासाठी जणू स्वतःला वाहून घेतले. आरंभी जिज्ञासा महाविद्यालय व नंतर एसएमआरके महाविद्यालयाची स्थापना करून शिक्षणापासून वंचित राहिलेल्या महिलांना तिने शिक्षणाचे नवे दालन उघडून दिले.
आज महिला शिक्षण, महिला सबलीकरण आणि स्वतःचे कुटुंब सांभाळणारी माझी माय सर्व स्त्रियांसाठी आदर्श बनली आहे. तिचे व्यक्तिमत्व अतिशय तेजस्वी पण तितकेच सात्विक होते. सुहास्य वदन, प्रसन्न दर्शन आणि मधूर संभाषण अशा सहज स्वाभाविक अलंकारांनी नटलेली माझी आई नेहमी दुसऱ्याचा विचार करणारी होती. अतिशय साधी रहाणी असलेली आई अहंकार, प्रसिध्दी यापासून दूरच होती. सगळ्यांवर माया करणारी हसतमुखाने आदरातिथ्य करणारी आई स्वभावाने काटकसरी होती. वेळ, अन्न आणि पैसा वाया गेलेलं तिला कधीही आवडत नव्हतं. तिच्या साध्या रहाणीला तिच्या सौंदर्यदृष्टीची जणू किनार लाभली होती. त्यामुळे स्वच्छता, टापटीप आणि वेळेचे पालन या बाबतीत ती अतिशय दक्ष होती. तिने आपल्या आचरणातून हे संस्कार आम्हा भावंडांवर केले. आणि तिच्या याच गुणांमुळे ती माझे वडिल ति. अप्पांना त्यांच्या कार्यात मोलाची साथ देवू शकली.
पारिवारीक जबाबदाऱ्या, महाविद्यालयाची प्राचार्या म्हणून येणाऱ्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पेलतांना तिने आपल्या कला, छंद, आवड ह्यांना उपेक्षित ठेवले नाही. अनेक प्रकारच्या हस्तकला, पाककला, संगीत या सगळ्यात ती निपूण होती. आपल्या कामातून ती या सर्वांसाठी वेळ काढत होती. आणि त्यामुळे ती मला नेहमी आनंदी, समाधानी दिसली. हा आनंद, हे समाधान भौतिक समृद्धीमुळे आलेले नव्हते. हा तिचा शाश्वत असा सच्छिदानंद होता. जो ज्ञान, कला, प्रेम आणि वात्सल्य ह्यातून तिला मिळत होता. तिच्या भक्तीभावातून आणि गाण्याच्या आवडीतून तिने स्वानंद भजनी मंडळाचे काम अतिशय उत्साहाने पाहिले.
शिवपार्वती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजपर्यंत ३०० च्या वर समाज सेवाव्रती दाम्पत्त्यांची अनुबंधी परिवार निर्मिती केली आहे. तिचा सत्संग रुद्र पठण, श्री सुक्त पठण हे शेवटपर्यंत चालू होते. ह्या अक्षय आनंदात आम्हीही नेहमी सहभागी होत असू. ह्या सर्वासाठी तिला अनेक मान सन्मान मिळाले. दिल्ली येथील IBS संस्थेकडून आदर्श महिला पुरस्कार, गोखले एज्युकेशन सोसायटीचा ‘आदर्श प्राध्यापिका पुरस्कार’, Indian International Society चा ‘शिक्षण रत्न पुरस्कार’ आदी मिळाले आहेत. खरंतर आईशी माझे नाते हे दोन प्रकारचे होते. माझी आई म्हणून तिने माझ्यावर उत्तम संस्कार तर केलेच आणि मला एक जबाबदार नागरीक घडवले. त्याचबरोबर मी चांगल्या पद्धतीने स्वतःचे करिअर घडवावे ह्यासाठी पण ती आग्रही होती. मी माझ्या माता पित्यांप्रमाणे शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले. त्यांचा आदर्श तर समोर होताच पण आईचा आग्रह असायचा की या क्षेत्रात मी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करावी. त्यासाठी तिचे सतत प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि पाठिंबा मला मिळत होता. आज मी शिक्षण क्षेत्रात आत्मविश्वासाने कार्य करत आहे, स्वतंत्र विचाराने नवे निर्णय घेत आहेत, तेव्हा ईश्वरी कृपेबरोबरच तिचे आशीर्वाद मला पाठबळ देत असतात. शिक्षकी पेशा हा दहा ते पाच कार्यालयात काम करण्यापेक्षा खूप वेगळा असतो. शिक्षकाला स्वयं अध्ययनासाठी, संशोधनासाठी दिवसाचे 24 तासही कमी पडतात. माझी आई आपले शैक्षणिक कार्य व पारिवारीक जबाबदाऱ्या या दोन्हीतही संतुलन राखू शकली. कारण तिच्या कामावर तिची श्रद्धा होती. मी स्वतः जेव्हा या सर्व प्रवासाचा अनुभव घेतला तेव्हा तिचे मोठेपण मला तीव्रतेने जाणवले. ३० नोहेंबर रोजी तिला निरोप देताना जणू आभाळालाही गहिवर आला होता, ती माझी आई होतीच आणि म्हणून त्या शेवटच्या निरोपाच्या क्षणी कवी ग्रेसांच्या शब्दात माझ्या भावना मी व्यक्त करते. ‘ती आई होती म्हणूनी, घनव्याकुळ मी ही रडले.’