जव्हार फाटा ते वेळुंजे रस्त्याची खड्ड्यांमुळे उडाली दैना :  घरघर संपत नसल्याने प्रवाशांमध्ये संताप : वेळुंजे ते वाघेरा रस्त्याचीही उखडली पट्टी

सुनिल बोडके : इगतपुरीनामा न्यूज, दि. 5

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अति महत्त्वाच्या हरसूल ते त्र्यंबकेश्वर रस्त्यावर जव्हार फाटा ते वेळुंजे रस्त्याची अतिशय केविलवाणी अवस्था झाली आहे. मागील पावसाळ्याच्या आधीपासून केवळ ठेकेदाराच्या चुकीमुळे हा रस्ता लांबला असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या आधीपासूनच या रस्त्याला खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर अनेक दुचाकी वाहनधारकांचे अपघात झाले. मात्र असे असुनही बांधकाम विभाग मात्र झोपेचे सोंग घेऊन गप्प आहे.

पावसाळा संपला असून आता तरी हा रस्ता होईल का नाही याची मात्र या भागातील नागरिकांना चिंता भेडसावत आहे. ह्या रस्त्यावरील असंख्य खड्ड्यांचा सामना सहा किलोमीटर  प्रवास करताना करावा लागतो. ही दमछाक अत्यंत जीवघेणी झालेली आहे. वेळुंजे ते वाघेरा पर्यंतच्या रस्त्यावर वरची पट्टी उखडल्याने सुद्धा खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन ठेकेदारांकडून चांगल्या दर्जाचे रस्ते तयार करून घ्यावे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

या रस्त्याबाबत कार्यालयामार्फत कार्यवाही सुरू होताच रस्ता तयार केला जाईल. सतत पाऊस पडत असल्याने रस्ता तयार करण्यास अडचणी निर्माण होत आहे.
- संदीप फडांगळे, सा. बां. विभाग त्र्यंबकेश्वर

Leave a Reply

error: Content is protected !!