लेखन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक
आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका अगदीच तोंडावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर नव्या गट गणांची निर्मिती, राजकीय आरक्षण, महिलांचे आरक्षण ह्या प्रक्रिया अद्यापही लटकलेल्या आहेत. ह्या काळातच राजकीय सोयीसाठी नीतिमूल्ये गुंडाळून पक्षांतर जास्त वेगाने होतात. राजकारणात नेमक्या अंदाजाला मोठी किंमत असते. तो अंदाज घेऊनच पक्षांतराचा निर्णय घ्यायचा असतो. योग्य वेळी केलेल्या पक्षांतराचे उत्तम उदाहरण म्हणजे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर आणि विद्यमान सभापती सोमनाथ जोशी यांचे द्यावे लागेल. ह्या दोघांनी योग्य वेळी घेतलेला निर्णय त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन गेला.
निवडणुका जवळ आल्या की पक्षांतराचे वारे जोरदार वाहू लागतात. असमतोल पृष्ठभागावर पाणी नेहमी उताराकडे धावते तसे राजकारणी नेहमी ( सत्तेच्या ) चढाच्या दिशेने धावत असतात. कार्यकर्त्यांचे मोहोळ सोबत असल्याचा कितीही आव आणला तरी यांचे कार्यकर्ते खरोखर सोबत असतात काय ? हा खरा प्रश्न असतो. यासह राजकारणात आयाराम गयाराम संस्कृतीला गेल्या काही वर्षांत जास्तच महत्त्व आले असले तरी त्यात गेलेले अनेक नेते राजकारणात फार काही यशस्वी झाले असेही नसते. काही महिन्यांपासून आतापर्यंत झालेल्या पक्षांतराच्या घटना ह्या सर्व प्रक्रिया गोठलेल्या असल्याने आत्मघातकी ठरणार असल्याच्या शक्यता मात्र जास्त आहेत. म्हणूनच योग्य वेळी केलेले पक्षांतर विजयाच्या दिशेने केलेली वाटचाल असते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ’त्या पक्षात नाही गेलो तर आपला नेता सोबत रहाणार नाही’ ह्या भीतीने केलेल्या पक्षांतराचे सर्वाधिक राजकीय नुकसान होत असते.
निवडणुकांचा सगळाच गोंधळ पाहता हा काळ अजिबात पक्षांतर करावा असा निश्चितच नाही. सत्तेच्या बाजूला असणे हा पक्षांतराचा मुख्य उद्देश असतो हे वेगळे सांगायची गरज नाही. पण नेहमीच असे पक्षांतर सत्तेच्या दिशेने होते असेही म्हणता येत नाही. त्याला आणखी काही आयाम असतात. उमेदवारी मिळवणे, केवळ सत्तेच्या बाजूला जाऊन भविष्यात काही स्वार्थ साधण्याचा प्रयत्न साधता येईल या उद्देशाने पक्षांतराला बरीच कारणे असू शकतात. यापलिकडे, आपले उद्दिष्ट सफल होण्यासाठी आपली नजर असलेला, आपल्यासाठी अनुकूल मतदारसंघ, त्यातील संभाव्य पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी, त्यांचे नि आपले श्रेष्ठींकडे असलेले वजन, प्रतिपक्षाकडे असलेली लायक उमेदवाराची वानवा, आपला पक्ष सत्तेजवळ जाण्याच्या शक्यता आदी घटकांचा विचार करून पक्षांतराचे निर्णय घेतले जातात.
स्वत:च्या घरुन डबा नेऊन नेत्याच्या प्रचाराला जाणारी पिढी केव्हाच अस्तंगत झाली. आता प्रचारासाठी पैसे, दारु नि जेवण वसूल करणारे आणि सभेसाठी लोक जमवण्याची ठेकेदारी करणारे ’कार्यकर्ते’ असतात. नेत्याला पदाची नि पदापासून मिळणार्या आर्थिक ताकदीची जशी आस असते, तसेच या कार्यकर्त्यांनाही त्यातला आपला वाटा हवा असतो. त्यामुळे साहजिकच त्या खर्चाचा ’परतावा’ त्यांनाही हवा असतोच. हे दोनही उद्देश नेता सत्तेच्या वर्तुळात राहिला तर सफल होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सत्तेचे वारे विरोधी दिशेने वाहू लागले, पुढचे सत्ताधारी वेगळे असतील याचा अंदाज आला, की कार्यकर्तेही नेत्यावर पक्षबदलासाठी दबाव आणू लागतात. नेत्याला स्वपक्षात हवे ते सत्तास्थान मिळत नाही म्हटल्यावर ’ते जिकडे असतील, तिकडे आम्ही सोबत असू.’ अशी जाहीर विधाने करत नेत्याला पक्षांतरास उद्युक्त करत असतानाच, ’नाही गेलास तर सोबत नसू.’ अशी सूचक धमकीही देऊन ठेवतात. पण नेता-कार्यकर्ता हे नाते सहजीवनाचे असल्याने, अनेकदा नेताही स्वत:ची इच्छा कार्यकर्त्यांकरवी जाहीर करुन ’कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर पक्षांतर’ करुन स्वार्थलोलुपतेच्या आरोपातुन स्वत:ची सुटका करुन घेताना दिसतो.