इगतपुरीनामा न्यूज, दि. ४
“जपून ताजी ठेवा ऊब रे उकडत्या रक्ताची, पेटवा अग्नी विद्रोहाचा दाखवा निखार आपला” प्रा. निशांत गुरु यांनी पहिलीच कविता सादर करत विद्रोहाचे महत्त्व अधोरेखित केले. “शाल आली कांबळे आले साडी आली चोळी आली, मात्र शेतकऱ्यांच्या जीवनाची राखरांगोळी झाली” असं म्हणत शुभदा शुक्ल यांनी शेतकरी राजाचे दुःख कवितेतून मांडले. “इतकं जगून झालं पण जगायला आज वेळ नाही, जगतो आहोत कशासाठी काहीच कसला मेळ नाही” असं म्हणत देविदास चौधरी यांनी भ्रामक जगण्यातील फोलपणा स्पष्ट केला. विद्रोही मराठी साहित्य संमेलनानिमित्त झालेल्या कैलास पगारे कवी मंच या कार्यक्रमात अनेक कवींनी कविता सादर केल्या. रावसाहेब थोरात सभागृहात रात्री अकरा वाजता सुरू झालेल्या या संमेलनात कवींचा प्रचंड उत्साह होता. यावेळी अनेक सामाजिक विषयावरील कवितांचे वाचन करण्यात आले. विक्रम गांगुर्डे, प्रविण जाधव, देवभाऊ उबाळे, संदीप मोरे, सौरभ आहेर, आनंद घायवट, द्वारका धांडे, स्वप्नील गरुड, संदीप पगारे, वालू आहेर, गुणवंत वाघ, देविदास चौधरी, गजानन बेले, अनुकूल माळी, अशोक पगारे आदी कवींनी कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून कवी प्रमोद अहिरे, अरुण घोडेराव, रविकांत शार्दुल यांनी काम पाहिले.