इगतपुरीनामा न्यूज, दि. ४
शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याने त्यांचा आदर्श विद्यार्थी घेत असतात. त्यामुळे शिक्षकांनी आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी केले. इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता सेलच्या वतीने निसर्गोपचार योगा व विपश्यना या विषयावर शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. भाबड बोलत होते.
ते पुढे म्हणाले की कोविडमुळे आरोग्याकडे मोठ्या प्रमाणात जगाचे लक्ष वेधले गेले असून महाविद्यालयात शिक्षकांसाठी योगा आणि विपश्यना सारख्या कार्यक्रमाची आवश्यकता आहे. याप्रसंगी कुर्ला मुंबई येथील हेल्थ केअर सेंटरचे गिरीश जैन यांनी योगा व विपश्यनेचे महत्त्व सांगितले. यामुळे आत्मबल वाढवून मानसिक धैर्य वाढते. शिक्षकांनी विपश्यनेच्या माध्यमातून आपल्या जीवनशैलीत बदल करावा असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांनी करून दिला. प्राचार्य डॉ. भाबड यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. अंतर्गत गुणवत्ता सेलचे समन्वयक प्रा. एस. एस. परदेशी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.