इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०
राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी इगतपुरी आगारातील एस. टी. कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आज इगतपुरी आगारात उपोषण केले. राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे २ दिवसापासून इगतपुरी आगारातील एस.टी. ची चाके फिरलीच नाहीत. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.
राज्यभरात आतापर्यंत एकूण ३१ कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. तर आज २ कामगारांनी आत्महत्या करुन जीवन संपविले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ते कुटुंब रस्त्यावर आले आहेत. कोरोनाच्या काळात राज्यभरात एस. टी. कामगारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोटा राजस्थान येथून विद्यार्थ्यांची वाहतूक केली आहे. परप्रांतीय मजुरांना देखील त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडले आहे. मुंबईच्या बेस्ट उपक्रमात देखील प्रवाशांची वाहतुक करुन उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्यभरातील १६५ कर्मचारी हे सेवा पूर्ती करत असतांना कोरोनाने बाधीत होऊन त्यांनी आपला जीव गमावला आहे. असे असतानाही एसटी कामगारांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. त्यांच्या बाबतीत अनास्था दाखवत राज्य शासन दुजाभावाची वागणुक देत आहे. त्याला कंटाळुन इगतपुरी आगारातील वेगवेगळ्या संघटनांनी एकत्र येऊन कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. इगतपुरी आगारातील एस.टी.कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्यामुळे २ दिवसापासुन एकही एस. टी. बस रस्त्यावर धावली नाही.