७० लाखांचा विकासाचा निधी ग्रामसेवकाअभावी अखर्चित
इगतपुरीनामा न्यूज, दि. २९
इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर ग्रामपंचायतीमध्ये गेल्या ३ महिन्यांपासून ग्रामसेवक नसल्याने येथील विकासकामांना खीळ बसली आहे. ७० लाखांची रक्कम ग्रामपंचायतीकडे पडलेली असतांना संपत आलेल्या आर्थिक वर्षात ही रक्कम परत जाण्याचा धोका वाढला आहे. ३ महिन्यांपूर्वी तत्कालीन ग्रामसेवक निलंबित झाल्यानंतर समजूत काढण्यासाठी अतिरिक्त कार्यभार असणारे ग्रामसेवक काही दिवसांसाठी दिले जातात. ह्या काळात ते ग्रामसेवक गावी तर येत नाहीच पण आर्थिक व्यवहार करण्यासाठी सह्या नमुने सुद्धा बदलत नाही. परिणामी येथील ग्रामस्थ प्रचंत संतप्त झाले आहेत. पाणीपुरवठा आणि पथदिव्यांचे बिल थकल्याने विजेचे कनेक्शन तोडण्यात आलेले आहे. यामुळे गावात काळोख आणि पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. ह्या भागात अंधारामुळे बिबट्या आणि वन्य प्राणी मानवी वस्तीत येत असल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. ग्रामसेवक नसल्याने येथील गावगाडा थांबला असून नागरिकांचा संताप वाढत चालला आहे. इगतपुरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड आणि विस्ताराधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून दिवाळीच्या आधीच नव्याने नियमित ग्रामसेवक द्यावा अन्यथा कुठलीही पूर्वसूचना न देता आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. काळोखामुळे बिबट्या किंवा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ग्रामस्थांपैकी कोणाला नुकसान झाल्यास यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना जबाबदार धरावे असे ग्रामस्थांनी सांगितले.
इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथे ग्रामसेवक नसल्याने ग्रामविकासाच्या योजनांसाठी ग्रामपंचायत स्तरारील निर्णय घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे ह्या गावाला ग्रामसेवक मिळणार का नाही असा सवाल येथील नागरिकांनी केला आहे.
इगतपुरी पंचायत समितीचे अधिकारी ह्या प्रकरणी ग्रामस्थांना वेठीस धरीत असून त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ७० लाखांचा विकासकामासाठीचा निधी पडून असून रहिवासी प्रमाणपत्र, नमुना नंबर आठ “अ’चा उतारा, जन्म-मृत्यू यासारखे ग्रामपंचायत स्तरावर लागणारे कागदपत्रे ग्रामसेवकाअभावी ग्रामस्थांना मिळेनासे झाले आहेत. नियमित ग्रामसेवकांच्या अभावी पाणीपुरवठ्याची कामे रखडली आहे. रोगराई वाढण्याची शक्यता असून आरोग्याची कामे देखील खोळंबली आहेत. ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन, पथदिवे, यांमुळे अंधाराची छाया दाटली आहे.
ह्या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असते. यापूर्वीही परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ मोठ्या संकटात सापडले आहेत. ग्रामस्थांचा बिबट्याच्या संघर्षाने अथवा रोगराईने जीव गेल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार गटविकास अधिकारी यांना धरावे अशी ग्रामस्थांची भावना व्यक्त होत आहे. पिंपळगाव मोरला नियमित ग्रामसेवक मिळाल्यास गावचा ७० लाखांचा निधी विकासकामांसाठी खर्च करता येऊ शकतो. ऐन दिवाळीत ग्रामस्थांवर संकटांची छाया गडद असल्याने आक्रमक पद्धतीने मोठा मोर्चा नेण्याचे ग्रामस्थांचे नियोजन सुरू आहे अशी माहिती ग्रामस्थ राजाराम काळे, शांताराम काळे, जगन बेंडकोळी, रमेश बेंडकोळी, श्रीधर पगारे, नामदेव खोडके, शाम कुलाळ, रमेश मेंगाळ, नंदू बांगर, उमेश बेंडकोळी यांनी दिली.
आर्थिक वर्ष संपायला आलेले आहे. तरीही कुठलाही खर्च ग्रामपंचायतीला करता येत नाही. पंचायत समिती कार्यालय दर महिन्याला ग्रामसेवक बदलत असल्याने सही नमुने बदलता येत नाहीत. बँकेचे सही नमुने न बदलल्याने निधी खर्च करता येत नाही. गावाला पूर्णवेळ ग्रामसेवक न मिळाल्यास आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल.
- उमेश बेंडकोळी, ग्रामस्थ पिंपळगाव मोर