
इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
कोरोना महामारी आजारापासून हमखास बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणे अत्यावश्यक आहे. यासह लसीकरण केल्याने राष्ट्रीय कार्याला हातभार लागतो. यामुळे आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे संक्रमणापासून संरक्षण होते. या पार्श्वभूमीवर कोरोना विरुद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी घोटी येथील लॉयन फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. काननवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने घोटी येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर संपन्न झाले. इगतपुरी तालुक्यातील उच्चांकी ठरलेले हे शिबिर असून ८५८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
कोरोनामुळे सगळीकडे सर्व क्षेत्रातील परिस्थिती बिघडून गेली आहे. आता कुठे सर्वजण सावरत असतांना ह्या आजारापासून संरक्षण होणे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक आहे. घोटी शहरातील नागरिकांना गर्दी, व्यवसायाची जबाबदारी, लसीची कमतरता आदी कारणांमुळे इच्छा असूनही लसीकरण करायला अडचण येत होती. ही महत्वपूर्ण बाब हेरून लॉयन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप किर्वे, आगरी सेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा मनसे शहरप्रमुख निलेश जोशी, प्रचितराय महाराज टॅंकर सप्लायर विकास जाधव, वासुदेव चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष किरण गुंजाळ, विशाल वालतुले यांनी घोटीत लसीकरण शिबिर आयोजित केले. राजे छत्रपती मित्र मंडळ, संताजी मित्रमंडळ, वासुदेव चौक मित्रमंडळ, समस्त घोटी मित्रमंडळ आदींनी ह्या कामासाठी परिश्रम घेतले.
काननवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या साहाय्याने लसीकरण शिबिराला आतापर्यंतचा उच्चांकी प्रतिसाद लाभला. ह्या शिबिरात ८५८ नागरीकांनी लसीकरण करून घेतले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वनाथ खतेले, डॉ. रवींद्र क्षीरसागर, डॉ. मधूलिका क्षीरसागर, विजय सोपे, एम. एम. कुलकर्णी,परशराम चौधरी, सागर गुंड, आरोग्यसेविका कल्पना इंदारखे, जे. एस. घाणे, सुजाता पवार, किरण अग्रवाल, ज्योत्स्ना शेवाळे, आशा कर्मचारी शोभा बारावकर, सुरेखा शेवाळे, रमा पटेकर, अरुणा लहानगे, मानसिंग पावरा यांनी साहाय्य केले.