
इगतपुरीनामा न्यूज, दि. १८
त्र्यंबकेश्वर नाशिक येथील हेदपाडा गावाचा परिसर डोंगराळ आणि पाण्याची योग्य सोय नसल्यामुळे गावातील कुटूंबाना रोजच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. राहत्या ठिकाणापासून पाण्याच्या सोयीचे ठिकाण दूर अंतरावर ४ किलोमीटर वर आहे. त्यासाठी उंच, आणि त्यात डोंगराळ खडक असल्यामुळे डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी करावी लागणारी ही रोजची कसरत स्थानिक लोकांसाठी जीवघेणी होती. यालाच पर्याय म्हणून वेल्स ऑन व्हील्स आणि युनायटेड व्ही स्टँड च्या संस्थेने सामाजिक जाणिवेतून एकत्र येऊन गावातील सर्व ६० कुटुंबासाठी वॉटर व्हील उपलब्ध करून देण्यात आले.
व्हीलमुळे त्यांची जीवघेणी कसरत कमी होऊन पाणी आणणे सोयीस्कर होणार आहे. हे व्हील हे ५० लिटरचे असून त्यात ४ हंडे पाणी बसते. ते सहज हाताने लोटत आणता येते. डोक्यावर पाणी आणल्यामुळे मानेचे , मणक्याचे व कंबरदुखीच्या अनेक आजारांचा सामना करावा लागतो. ह्या ड्रममुळे कुठले ही कष्ट न करता सहज पाणी आणता येईल व आजारपण देखील कमी होणार आहे. ही भेट संपूर्ण गावासाठी एक उत्तम आरोग्यदायी वस्तू ठरली. त्यामुळे संपूर्ण गावाने संस्थेच्या सदस्यांचे आभार व्यक्त केले. त्याच बरोबर महिला सदस्यांनी सॅनिटरी नॅपकिन्स, त्याचा वापर, त्याची जनजागृती गावातील महिलांमध्ये करून त्याचे वाटप केले. यावेळी वेल्स ऑन व्हील्स संस्थेचे अजय देवरे, गोकुळ ढोमसे, विजय देवरे, अनुप मोरे, नारायण आणि युनाईटेड वी स्टँड फाउंडेशनचे सागर मटाले, निलेश पवार, ॲड. हनी नारायणी, स्मृती आवारे आदी उपस्थित होते.
