स्त्री शिक्षण व सक्षमीकरणासाठी झटणारी नवदुर्गा : डॉ. दिप्ती देशपांडे

लेखन : प्रा. छाया लोखंडे, एसएमआरके महिला महाविद्यालय नाशिक

ज्ञानदानाच्या क्षेत्रात ३६ वर्षांपेक्षा अधिक काळ तळमळीने काम तसेच समाजकार्य आणि ज्ञानदानाची उत्कृष्टरीत्या सांगड घालणाऱ्या शिक्षक, प्राचार्या आणि समाजसेविका असलेल्या 'एसएमआरके महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दिप्ती देशपांडे आज ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी थोडक्यात..

ज्ञानदानाचा वसा घेतलेले आणि गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी म्हणजेच आपल्या वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही त्यांच्यासारखेच आदर्श शिक्षक होण्याचे स्वप्न त्यांनी बालवयातच पाहिले. १९८३ साली बीवायके महाविद्यालयातून प्रथम श्रेणीत एम. कॉम उत्तीर्ण झाल्या. त्यावेळी गुणवत्ता यादीत झळकणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात अध्यापनासाठी संधी दिली जात असे. त्यासाठी पात्र ठरल्यामुळे १९८४ साली याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यामुळे त्यांचे शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. वडील डॉ. गोसावी यांच्याकडून त्यांना ज्ञानदानाचा वारसा तर लाभलाच परंतु त्याला स्वकर्तृत्वाची जोड देत त्यांनी एक स्त्री किती कुशल प्रशासक असू शकते याचा आदर्श घालून दिला.
व्याख्यातापदाची सुरुवात केल्यानंतर त्यांचा यशाचा आलेख चढताच राहिला. त्यांचे कुशल नेतृत्व, संघटन कौशल्य, उत्कृष्ट व्यवस्थापन ह्या गुणांची दखल घेत २००४ साली महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची धुरा त्यांच्या खांद्यावर आली. गेल्या १७ वर्षांपासून ती अत्यंत जबाबदारीने आणि  यशस्वीरीत्या सांभाळत महाविद्यालयाच्या नावलौकिकात त्या सतत भर घालत आहेत. सध्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मानवी संसाधन संचालिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व सांस्कृतिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक अशा कित्येक पैलूनी फुलले आहे. सर्व सहकारी शिक्षक आणि विद्यार्थिनींच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्या सदैव तत्पर असतात. शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यातदेखील प्रचंड आवड आहे. वाचन, छायाचित्रण हे त्यांचे छंदः संगीतातही त्यांना रुची असून संस्कृती व त्या अनुषंगाने येणाच्या सुसंस्कारांचादेखील आपल्यावर विशेष पगडा असल्याचे त्या सांगतात.

त्यांच्या कारकीर्दीत ‘शतरूपा’ या महाविद्यालयाच्या नियतकालिकाला उत्कृष्ट नियतकालिक म्हणून अनेकदा पुरस्कार प्राप्त झाले आहेत तसेच प्राचार्य टी. ए. कुलकर्णी पंचतारांकित उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार-२०१५ महाविद्यालयाला मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा सहभाग आहे. ‘सृजन’सारखे शैक्षणिक प्रदर्शन त्यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आयोजित केले जाते. ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून महाविद्यालयात चालणाऱ्या विविध अभ्यास क्रमांचा परिचय अनेक शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना करून दिला जातो . त्यांची स्वतःची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक परिषदा व चर्चासत्रांमध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कामांची दखल घेत त्यांना दादासाहेब गायकवाड पुरस्कार, एमएसजी फाऊंडेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आणि आयसीएफएआयचा आदर्श पुरस्कार, २००४ चा समाजश्री पुरस्कार, सक्सेसफूल वूमन ऑफ नाशिक पुरस्कार, गुणसंपन्न महिला हा आध्यात्मिक विद्यापीठाकडून मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार तसेच दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व व्यवस्थापन संस्थेतर्फे दिला जाणारा भारत शिरोमणी  पुरस्कार, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार जयपूर, कर्मयोगिनी पुरस्कार, सखी सन्मान पुरस्कार व रक्त मित्र पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मिळालेले पुरस्कार हे आपल्या चांगल्या कामाची पावती असून त्यामुळे प्रेरणा मिळत असल्याचे त्या सांगतात.

आपण निवडलेल्या क्षेत्रात स्वयंप्रज्ञेने, नवकल्पना, नवयोजना नवउपक्रम यशस्वीपणे राबविणाऱ्या प्राचार्या व गो. ए. सोसायटीच्या एच. आर. डायरेक्टर डॉ. दीप्ती देशपांडे ह्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! प्राचार्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कर्तृत्वशाली जीवनाचा आढावा घेणाऱ्या लेखांचा संग्रह असणाऱ्या गौरव ग्रंथाचे प्रकाशन ८ ऑक्टोबरला महाविद्यालयात मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!