इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
इगतपुरी तालुक्यातील नागरिकांना आता विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आज शुक्रवारी तालुक्यात तब्बल ३६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तालुक्यातील कांचनगाव येथे एकाच कुटुंबात १४ जणांना कोरोना बाधा झाल्याचे वृत्त आहे. तर यांच्यासह इतर २ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. दुसरे धक्कायदायक म्हणजे धामनी गावात १५ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. आरोग्य प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना हाती घेतल्याचे सांगण्यात आले.
कोरोनाचा कहर वाढत असून आज सापडलेल्या रुग्णांसह बाधितांची संख्या लक्षणीय वाढत आहे. स्थानिक प्रशासन आणि आरोग्य प्रशासन तत्परतेने उपाययोजना करीत आहे.
■ इगतपुरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी आता विशेष काळजी घेण्याची गरज आहे. मास्कचा वापर करावा. वारंवार हात धुवावेत. सॅनिटायझरचा वापर करावा. कोणतीही लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा. जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन केल्यास कोरोनाचा नायनाट करणे शक्य आहे.
– डॉ. एम. बी. देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी, इगतपुरी
