इगतपुरीनामा न्यूज दि. १० : कोविड संसर्ग पूर्णपणे गेला नसल्याने सध्याच्या वातावरणात परीक्षा घेणे हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे, याच पार्श्वभूमीवर माननीय उच्च न्यायालयाने अकरावीची सीईटी परीक्षा रद्द केली आहे. तोच संदर्भ घेवून आमदार कपिल पाटील यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करावी अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. मात्र कोविडमुळे मागील शैक्षणिक वर्षाची (२०२०-२१) इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा होवू शकलेली नाही. कोविड पार्श्वभूमीवर रद्द झालेली शिष्यवृत्ती परीक्षा यावर्षी म्हणजे चालू शैक्षणिक वर्षात (२०२१-२२) घेण्याचे नियोजन परीक्षा परिषदेने केले असून संपूर्ण राज्यात गुरुवारी (दि. १२) ही परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र कोविडमुळे अजूनही परिस्थिती पूर्वपदावर आली नसल्याने ही परीक्षा घेण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या हिताचा नसून परीक्षा तातडीने रद्द करावी अशी मागणी आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
दरम्यान परीक्षा परिषेकडून परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेशपत्र सुध्दा मिळाले आहेत, त्यामुळे दोन दिवसांवर आलेली शिष्यवृत्ती परीक्षा रद्द होते की मुलांना परीक्षेला सामोरे जावे लागते याकडे पालकांचे लक्ष लागून आहे. आमदार कपिल पाटील यांच्या मागणीनुसार परीक्षा रद्द केली जाणार असेल तर त्यासाठी फक्त उद्याचा दिवस शिल्लक आहे, त्यामुळे उद्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.