निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
खेड येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रम शाळा येथे आज आदिवासी विकास विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या खावटी योजनेअंतर्गत परिसरातील वासाळी, खेड, काननवाडी, परदेशवाडी आदी गावातील आदिवासी महिला, पुरुष, दिव्यांग, वनहक्क, विधवा अशा आदिवासी पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्य, कडधान्य,इतर जीवनावश्यक अशा जवळपास दोन हजार रुपयांच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये रोख स्वरूपातही जमा होणार आहेत. यावेळी खेडच्या सरपंच लहानूबाई कचरे, वासाळीचे सरपंच काशिनाथ कोरडे, नवसू कोरडे, माजी सरपंच मच्छिंद्र मधे, गोविंद धादवड, लक्ष्मण परदेशी आदी उपस्थित होते. शासकीय कर्मचारी पुरुषोत्तम सातपुते, पांडुरंग आगिवले, रवींद्र हुजरे, वर्षा परदेशी आदींनी साहित्याचे वाटप केले.
धामणगाव येथील आश्रमशाळेत देखील परिसरातील आदिवासी कुटुंबाना आदिवासी खावटी योजनेअंतर्गत धान्य वाटप करण्यात आले. यावेळी माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, पंचायत समिती सदस्य विमल गाढवे, बाळासाहेब गाढवे, अशोक मोरे, शिवाजी गाढवे, निवृत्ती जाधव, आदिवासी विकास विभाग अधिकारी चंदनशिवे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांकडून नागरिकांना धान्य-साहित्य वाटप, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घ्यावयाची सुरक्षितता, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे, आपल्यासह कुटुंबाची काळजी घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या.