
इगतपुरीनामा न्यूज – आवळखेड येथील शाळकरी विद्यार्थिनी आणि महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी ३ किलोमीटर भर उन्हातान्हात जावे लागते. या पाणीटंचाईबाबत आज “इगतपुरीनामा न्यूज”वर बातमी प्रकाशित करण्यात आली. ह्या बातमीची दखल मुंबई येथील पेहेचान प्रगती फाउंडेशनकडून घेण्यात आली. फाउंडेशनकडून तातडीने आवळखेड आणि चांदवाडी ह्या गावांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याचे टँकर मोफत पाठवण्यात आले आहेत. तालुका प्रशासनाकडून शासकीय टँकर सुरु होईपर्यंत ही पाण्याची सेवा सुरु ठेवणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी फाउंडेशनतर्फे राज्य आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांनी ग्रामस्थांशी समन्वय साधून देत स्वतः पाठपुरावा करून टँकर सुरु केले. आदिवासी महिला आणि विद्यार्थिनींनी पेहेचान प्रगती फाउंडेशनची कृतज्ञता व्यक्त केली आहे. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर आणि खासदार राजाभाऊ वाजे यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. ह्या नेत्यांना लोकांची कीव आली नाही मात्र पेहेचान प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांनी लोकांसाठी पाण्याची सेवा उपलब्ध करून दिली. याबद्दल एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनीही आभार मानले आहेत.