
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील आवळखेड ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शालेय विद्यार्थिनी, महिला आणि लहान मुले देखील पाण्यासाठी तीन किलोमीटर अंतर पार करत, खोल दऱ्याखोऱ्यातून पायवाटेने गढूळ विहिरीकडे प्रवास करत आहेत. शिकण्याच्या वयात असलेल्या चिमुकल्यांना पुस्तके हातात न धरता पाणी भरण्याची कसरत करावी लागत आहे, ही बाब खरोखरच काळजाला भिडणारी आहे. परीक्षेच्या काळात शालेय विद्यार्थी पाणी भरत असल्याने ह्याचा दुष्परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होणार आहे. या गंभीर समस्येकडे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
आवळखेड गावकऱ्यांनी तपासलेल्या विहिरीतील पाण्याचे स्वरूप पिण्यायोग्य नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातूनच अनेक ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून जनावरांनाही यामुळे पाणी मिळत नाही, परिणामी अनेकांना जनावरे विकण्याची वेळ आली आहे. १० एप्रिलला टँकरसाठी प्रस्ताव देण्यात आला असला तरी अद्याप टँकर सुरू झालेले नाहीत. आवळखेडसारख्या पावसाच्या भरपूर प्रमाणात लाभलेल्या भागात देखील पाणीटंचाईची ही वेळ आली असल्याने नियोजनाच्या अभावाचे आणि प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचे चित्र स्पष्ट होते. ग्रामस्थांनी लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पाणी टंचाईची परिस्थिती तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्यापाड्यांवर असून ग्रामीण जनजीवन तृषार्त झाले आहे.
व्हिडीओ बातमी पहा