
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. ७१/२०२३ भा.द.वि. कलम ३०७, ४३५, ५०४, ५०६, ३४ सह भा. ह. का. कलम ३, २७ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. ह्या गंभीर गुन्ह्यात पोलिसांना आरोपी अनिल राजेंद्र ऊर्फ राजु सातपुते हा पाहिजे होता. मात्र तो शोध घेऊनही फरार असल्याने मिळून येत नव्हता. हा आरोपी मुंबई आग्रा महामार्गावर राजूर बहुला शिवारातील बैसाखी ढाब्याच्या समोर उभा असल्याबाबत नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना माहिती मिळाली. मिळालेल्या माहिती प्रमाणे त्यांनी फोनद्वारे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव व पोलीस हवालदार सचिन देसले, किशोर खराटे, किशोर बोडखे, रोहित पगारे, वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल बिऱ्हाडे यांना कळवले. मिळालेल्या बातमी प्रमाणे सापळा रचुन आरोपी अनिल राजेंद्र ऊर्फ राजु सातपुते याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीला वाडीवऱ्हे पोलीस ठाणे येथे पुढील कारवाईसाठी बुधवारी ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या आरोपीला जेरबंद केल्याबद्दल स्थानिक गुन्हा शाखेचे कौतुक करण्यात येत आहे.