इगतपुरीनामा न्यूज – लोकसभा विधानसभा निवडणुकांनंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुका होणे अपेक्षित होते. ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकीय राजवट असल्याने सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे आणि विकासकामे करण्यासाठी अडथळे येत आहेत. लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुका व्हाव्यात अशी सामान्य नागरिकांची मागणी आहे. सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही निवडणुकीसाठी तयारीत आहेत. ह्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणूका घ्याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष राहुल उत्तमराव सहाणे यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि निवडणूक आयोगाला त्यांनी याबाबत पत्र पाठवले असून नागरिकांच्या भावनांचा सन्मान करावा असेही पत्रात म्हटले आहे.
अडीच वर्षांपासूनची प्रशासकीय कारकीर्द लोकांच्या संतापाचा विषय ठरत आहे. जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर लोकप्रतिनिधी नसल्याने शासकीय विभाग बिनधास्त झाल्याने मनमानी कारभार वाढला आहे. लोकप्रतिनिधी नसल्याने शासकीय कार्यालयात सर्वसामान्य जनतेने पाठ फिरवली आहे. प्रशासकांच्या एकतर्फी कार्यपद्धतीमुळे भ्रष्टाचार डोके वर काढतोय. इगतपुरी तालुक्यातील ९६ ग्रामपंचायती आहेत. सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांच्यावर वचक ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधी नाही. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे विविध कामे रखडल्याचे दिसते. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी ही लोकशाहीची चाके असून एक चाक नसल्याने विकासाचा वेग मंदावला आहे. लवकरात लवकर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणूका होणे आवश्यक आहे. निवडणूका झाल्यास जनतेच्या अपेक्षा अधिकाऱ्यांपर्यंत पोहचून न्याय देता येईल असेही राहुल सहाणे यांनी पत्रात नमूद केले आहे.