भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप, उत्तरे प्रत्युत्तरे, भ्रष्ट्राचाराच्या चौकशा, सोशल मीडियावरील प्रचार यंत्रणा पाहता इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील प्रचाराची पातळी गंभीरपणे तळाशी गेली आहे. गेली १५ ते २० वर्ष ह्या मतदारसंघावर अधिराज्य गाजवणारी तीनही माजी उमेदवार सत्ता मिळवण्यासाठी सत्तासंघर्ष करीत आहे. दिवसेंदिवस प्रचाराला वेगवेगळे स्वरूप प्राप्त होत असतांना महाविकास आघाडी इंदिरा काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव यांनी मात्र इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचा अभूतपूर्व विकास करण्यासाठी कुडाच्या उमेदवाराला एकदा संधी द्यावी असा प्रचार सुरु केला आहे. अतिदुर्गम, ग्रामीण आणि आदिवासी भागात त्यांना मतदारांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसते आहे. महिलांना महिन्याला ३ हजार आणि मोफत एसटी प्रवास, बेरोजगारांना ४ हजार, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि स्थानिक समस्या सोडवण्यासाठी निवडून येताच कटिबद्ध असल्याचे लकीभाऊ जाधव सांगत आहेत. गावागावात त्यांना तरुण मतदार सक्रिय सहकार्य करून निवडून आणल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार व्यक्त करीत आहेत. मतदार लकीभाऊ जाधव यांची प्रचारपद्धत आणि त्यांच्या विकासाचे व्हिजन समजून घेत आहेत. त्यामुळे तीन माजी आमदार विरुद्ध कुडाच्या घरातील गरीब उमेदवार लकीभाऊ जाधव असा रंजक सामना रंगायला सुरुवात झाली आहे. १७ तारखेला अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या त्र्यंबकेश्वर येथील सभेनंतर राजकारण ढवळून निघणार आहे.
अनेक धरणे असून गावे तहानलेली आहेत. म्हणून प्रत्येक इथल्या धरणातील पाण्यावर पहिल्यांदा माझी मायबाप जनता आणि शेतकऱ्यांचा हक्क आहे. त्यांना हा हक्क मिळाल्याशिवाय पाण्याचा थेंब मुंबई आणि मराठवाड्याला जाऊ देणार नाही अशी लकीभाऊ जाधव यांची भूमिका प्रचारात मांडली जाते आहे. प्रत्येक गाव वाड्या पाड्या वस्त्या विकसित करून मूलभूत समस्या सोडवणार असून इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्वर, हरसूल येथे औद्योगिक वसाहतीद्वारे स्थानिकांना आपल्या हक्काचा रोजगार मिळवून देईल. इगतपुरी मतदारसंघात उच्च शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्याने युद्धपातळीवर त्यासाठी पुढाकार घेण्यात येईल. भक्कम आणि दर्जेदार रस्ते, शाळा, अंगणवाड्या उभ्या केल्या जातील. तळागाळापर्यंत आरोग्याची सुविधा पोहोचवून हा मतदारसंघ सदृढ आणि निरोगी करू असा प्रचार करण्यात येत आहे. कोणावर चिखलफेक न करता शाश्वत विकासासाठी माझ्या पंजा निशाणीसमोरचे बटण दाबून विजयी करण्याचे शेवटी आवाहन केले जाते. प्रचारावेळी मोठ्या संख्येने युवकांचा भरणा स्वतःहून सहभागी होतो. मतदारांच्या भेटी, आशीर्वाद, संवाद साधून विकासाचे व्हिजन सांगितले जाते. यामुळे इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात महाविकास आघाडी इंदिरा काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव यांचे पारडे जड होत चालले आहे.
बक्कळ पैशावाले आणि माझ्यासारख्या झोपडीतल्या गरीब उमेदवाराविरोधातल्या लढ्यात मायबाप मतदार माझ्या पाठीशी आहेत. धनदांडग्या आणि भांडवलदारांच्या विरोधातील ही लढाई असून सामान्य गरीब कुटुंबातील माझ्यासारख्या सामान्य युवकाला इगतपुरी विधानसभा मतदारसंघात मायबाप जनतेने निवडून द्यावे. मतदारसंघाला सक्षमतेने संगमनेरच्या धर्तीवर विकसित करण्याचे माझे स्वप्न आहे. ही निवडणूक माझ्यासारख्या गरीबाच्या विरोधात श्रीमंत लोकांनी उभी केली असली तरी मला इथली सुज्ञ जनता मला निवडून देईल असा मला विश्वास आहे.
- लकीभाऊ भिका जाधव, उमेदवार इंदिरा काँग्रेस