इगतपुरी – महायुतीतील शिवसेना शिंदे गट विरूध्द राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातील बेबनाव उघड : रवींद्र भोये यांची शिवसेना उमेदवारीची संधी थोडक्यात हुकली ; त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघात महायुतीत असलेला बेबनाव उघड झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणाला शिवसेनेने एबी पाठवत आपला इरादा स्पष्ट केला आहे. मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी महायुतीच्या शिवसेनेने स्थानिक भूमिपुत्र असलेले रवींद्र भोये यांना पक्षाचा एबी फॉर्म पाठवला. मात्र त्यास अवघ्या पाच दहा मिनिटांचा उशीर झाल्याने तांत्रिक कारणास्तव तो उमेदवारी अर्जासोबत जोडता आला नाही. मागच्या अनेक वर्षांपासून स्थानिकांना आमदार करण्यासाठी दोन्ही तालुक्यातील मतदारांच्या अपेक्षांना पालवी फुटली होती. मात्र मतदारांना गृहीत धरून महाविकास आघाडीतून निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करत महायुतीच्या राष्ट्रवादीची उमेदवारी पटकावलेल्या आमदार हिरामण खोसकर यांनी वेळ संपलेली असल्याने रवींद्र भोये आत गेलेच कसे असा त्रागा करत सरकारी कर्मचाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. यामधून आमदार हिरामण खोसकर यांना स्थानिक भूमिपुत्राला राजकीय पक्षाने तिकीट देऊ नये यासाठी आग्रही भूमिका असल्याचे तेथे उपस्थित असलेल्या दोन्ही तालुक्यातील जनतेच्या लक्षात आले. यावेळी रविंद्र भोये यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली असती आणि मैत्रीपूर्ण लढत झाली असती तर दुध का दुध आणि पाणी का पाणी हे स्पष्ट झाले असते अशी चर्चा आता मतदार संघात सुरू झाली आहे. दरम्यान  रवींद्र भोये यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यांच्या भूमिकेकडे दोन्ही तालुक्यांचे लक्ष लागले आहे. माघारी नंतर चित्र स्पष्ट होणार आहे मात्र पक्षांतराचा फार्स करत महायुतीच्या निष्ठावंतांना डावलले गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यांना न्याय मिळाल्याची भावना निर्माण करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या श्रेष्ठींनी केलेले प्रयत्न फोल ठरले आहेत. प्रत्यक्ष निवडणूकीत याचे पडसाद उमटतील असे दिसून आले आहे. महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नाही आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने दिलेल्या उमेदवाराच्या मागे शिवसेना शिंदे गट नाही हे उघड झाले आहे. पुढच्या काही दिवसात याचे परिणाम दिसून येतील.

रविंद्र भोये यांच्या समर्थकांना अश्रु अनावर  तइगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघात इच्छुक असलेले रविंद्र भोये हे आपला उमेदवारी फार्म दाखल करण्यासाठी हजारो समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्यानंतर समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. गेल्या १५ वर्षांपासून वंचित असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्याला पहिल्यांदाच शिवसेना पक्षाचा एबी फार्म मिळाला. पण निवडणूक अधिकाऱ्यांनी तो स्विकारण्यास हरकत घेतली असल्याचे कळताच रविंद्र भोये यांच्या समर्थकांना अश्रु अनावर झाले. यावेळेस माजी आमदार पांडुरंग गांगड, उपजिल्हाप्रमुख रघुनाथ तोकडे, इगतपुरीचे  माजी तालुकाप्रमुख संपत काळे, उपजिल्हाप्रमुख अरुण काशिद, अल्पसंख्याक तालुकाप्रमुख मुख्तार शेठ आदिसह मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!