इगतपुरी विधानसभा मतदारसंघात नेमकं काय वाढून ठेवलंय ?  

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यातील बहुचर्चित मतदारसंघ आहे. तीन पंचवार्षिक काँग्रेसच्या ताब्यात असणाऱ्या ह्या मतदारसंघात ह्यावेळी विद्यमान काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी धक्कादायकरित्या महायुतीतील राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे शिवसेना भाजपच्या इच्छुकांची चांगलीच गोची झाली. माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांना आदिवासी महामंडळ अध्यक्षपद देऊन तात्कालिक गाजर दाखवून संभाव्य बंडखोरी रोखली गेल्याचे वातावरण निर्माण केले गेले. पण अजय बोरस्ते यांनी दावा कायम असल्याचे सांगितले आहे. शिंदे सेना त्र्यंबकेश्वर तालुकाप्रमुख रवींद्र भोये आजच मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यथा मांडायला गेले आहेत. वेळ आली तर उमेदवारी करून मैत्रीपूर्ण लढत देण्याचा त्यांचा मानस आहे. शिवसेनेच्या उपनेत्या माजी आमदार निर्मला गावित यांनी महाविकासआघाडीकडून अर्थात काँग्रेसकडून उमेदवारी दिल्यास आपण लढायला सक्षम असल्याचे सांगितले आहे. काँग्रेसचे प्रबळ इच्छुक उमेदवार लकीभाऊ जाधव यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी समर्थक नेत्यांकडून जोरदार लॉबिंग सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी करायचीच अशी त्यांची भूमिका आहे. मनसे आणि वंचित आघाडी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. शिवसेना शिंदे गट पदाधिकारी आणि शिवसैनिक आक्रमक पवित्र्यात आहेत. अशा सगळ्या एकंदर संमिश्र वातावरणात इगतपुरी त्र्यंबक विधानसभा मतदारसंघ सापडला आहे. कोणत्याही क्षणी राजकीय वातावरण बदलून छोटा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. मतदारराजा ह्याकडे तटस्थ नजरेतून पाहत असला तरी त्याचा ज्वालामुखी काय करील याचा मात्र कोणाला सुगावा सुद्धा लागणार नाही.

आमदार हिरामण खोसकर यांनी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्षप्रवेश केल्यामुळे शिवसेना शिंदे गट, भाजप यांची अडचण झाली. नैसर्गिक तत्वानुसार इगतपुरी मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. मात्र खोसकर यांच्यामुळे अन्य इच्छुकांची द्विधावस्था झाली. राज्य पातळीवर याची दखल घेऊन शिंदे शिवसेनेचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांना आदिवासी महामंडळ अध्यक्षपद देण्यात आले. बंडखोरी रोखण्याचा हा सोपस्कार असला तरी मेंगाळ यांच्या पारंपरिक मतदारांना मात्र हे पचनी पडल्याचे दिसत नाही. दुसरे इच्छुक त्र्यंबकेश्वर तालुकाप्रमुख रवींद्र भोये यांनाही निवडणूक लढवायचीच असल्याने ते मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडायला शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या सोबत गेले आहेत. हिरामण खोसकर यांच्यामुळे महायुतीच्या इच्छुकांची झालेली अडचण हे मोठे दुखणे आहे. बंडखोरी नाही झाली तरी अंतर्गत नेमके कोणाला मतदान केले जाईल हा मुद्धा सुद्धा राजकारणाला वळण देणारा आहे. इगतपुरी त्र्यंबक मतदारसंघात धनुष्यबाण चिन्ह नसेल तर निष्ठावान शिवसैनिक कोणाचीही गाडी पलटी करून टाकू शकतो हे विसरता येणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्रपणे उमेदवारी करणार असून अन्य पक्षात डावलेल्या प्रबळ उमेदवाराला उमेदवारी दिली जाणार आहे. यामुळे महायुतीतील उमेदवारी न मिळालेले इच्छुक मनसेतर्फे रिंगणात असू शकतात. वंचित बहुजन आघाडीने भाऊराव डगळे यांना उमेदवारी देण्याबाबत अंतिम पवित्रा घेतला असला तरी त्यापेक्षा तुल्यबळ लढत देणाऱ्या उमेदवाराचे संशोधन मात्र सुरु आहे. महाविकास आघाडीत इगतपुरीची जागा काँग्रेसकडे आहे. सध्या लकीभाऊ जाधव हे प्रबळ आणि सक्षम दावेदार असले तरी त्यांना माजी आमदार निर्मला गावित यांचा अडसर आहे. काँग्रेसने उमेदवारी दिल्यास तुल्यबळ लढा देऊ असे निर्मला गावित म्हणाल्या आहेत. एकंदरीत इगतपुरी विधानसभा मतदारसंघात कोणत्याही क्षणाला काहीही घडू शकते असे वातावरण निर्माण झालेले आहे. कमी काळात मोठा मतदारसंघ पिंजून काढण्याचे आव्हान सर्व इच्छुक उमेद्वारांसमोर आहे. मतदार राजा कोणाला कौल देतो यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल.

Similar Posts

error: Content is protected !!