इगतपुरीनामा न्यूज – छत्रपती संभाजी राजे यांच्या नाशिक जिल्हा दौऱ्याबाबत स्वराज्य पक्षाची नाशिक जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियोजन आढावा बैठक संपन्न झाली. प्रास्ताविकात उमेश शिंदे यांनी सर्वांचे स्वागत करून बैठकीबद्धल मार्गदर्शन केले. स्वराज्य प्रमुख युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यात मर्द मावळे, बहुजन समाज, अठरापगड जातीतील वंचित, कष्टकरी, दिनदुबळ्या, श्रमजीवी यांच्या अथक परिश्रमातून स्वराज्य पक्ष काम करीत आहे. छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आजपर्यंत विविध पक्ष, समूह यांनी राज्यकर्ते म्हणुन काम करण्याचा प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळाले नाही. याचे कारण शिवरायांचे स्वराज्य लोकशाहीद्वारे टिकवण्याचं राज्यकर्त्यांनी न करता स्वार्थापोटी कष्टकरी गोरगरीब जनतेला वाऱ्यावर सोडले. स्वतःच्या पक्षाचं आणि स्वतःच्या घराचं चांगभलं करून घेण्यामध्येच या प्रस्थापितांनी प्राधान्य दिले. त्यामुळे महाराष्ट्र पिछाडीवर नेण्याचं काम प्रस्थापितांनी केले आहे. यासाठी विस्थापितांना न्याय देण्यासाठी स्वराज्य पक्षाने विडा उचललेला आहे. हे सार्थ करण्यासाठी नाशिक जिल्हा हा अग्रक्रमाने पुढे राहील. छत्रपती संभाजीराजे जी जबाबदारी देतील त्यांच्या आदेशाचे पालन करून त्यांचा दौरा यशस्वी करायचा आहे.
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीवर कटाक्षाने लक्ष देऊन छत्रपतींचे स्वराज्य हे सुराज्य करण्यासाठी पुढील वाटचाल सर्व शिलेदारांनी करायची आहे. याबाबत उपस्थितांना पूरक मार्गदर्शन करण्यात आले. सर्वांनी छत्रपतींचा हा दौरा न भूतो न भविष्य करण्याचा निर्धार करण्यात आला. महिला पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक युवतीला स्वसंरक्षणाच्या बाबत धडे देण्याचे काम स्वराज्यमार्फत करण्याचा शुभारंभ करण्याचा निर्धार करण्यात आला. स्वराज्यचे जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे यांनी युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी दिलेल्या आदेशापुढे नतमस्तक असल्याचे सांगितले. छत्रपतींना स्वराज्य म्हणून घडवायचं आहे यासाठी नाशिक जिल्हा नेहमीप्रमाणे अग्रेसर राहील याबाबत सर्वांना सोबत घेऊन पुढील वाटचाल होणार आहे. इतर जिल्ह्यांसह नाशिक जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केलेली असून प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नव्याने जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात येणार आहे असे सांगितले. राज्य कोअर कमिटी सदस्य ज्ञानेश्वर थोरात यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष केशव गोसावी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून गोसावी समाज हा राजांच्या सोबत होता. आजही त्यांचे वंशज छत्रपती संभाजी राजे यांच्या सोबत तितक्याच ताकतीने उभे आहे असे सांगितले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.