इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील चिंचलेखैरे ( गावठा ) येथील एका जनावरांच्या गोठ्यात नरभक्षक बिबट्या दडुन बसला आहे आणि ग्रामस्थ भयभीत झाल्याबद्धल भ्रमणध्वनी वरून एका ग्रामस्थाने वनपरिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव यांना कळवले. घटनेचे गांभीर्य ओळखून बिबट्याला पकडण्यासाठी भाऊसाहेब राव यांनी उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार व इगतपुरीचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांना तातडीने माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव, पोपट डांगे, प्रितेश सरोदे, सुरेश चौधरी, वनरक्षक सोमनाथ जाधव, फैजअली सय्यद, गौरव गांगुर्डे, विठ्ठल गावंडे, शरद थोरात, चिंतामण गाडर, कैलास पोटींदे, प्रकाश साळुंखे, गोरख बागुल, मालती पाडवी, मंगल धादवड, मंदा पवार, कावेरी पाटील, मनिषा सोनवणे, स्वाती लोखंडे, वैशाली पासलकर आदी टीम इगतपुरीत हजर झाली.
रेस्क्यू टीम लीडर थोरात व सर्व रेस्क्यू टीमला सविस्तर मार्गदर्शन करून टीमचे विभाजन केले. आवश्यक असणारे साहित्य सोबत घेऊन शासकीय व खासगी वाहन घेऊन सर्व टीम बिबट्या दडुन बसलेल्या जनावरांच्या गोठ्याच्या जागेवर पोहोचल्या. ग्रामस्थांना याबाबत सविस्तर सूचना देऊन गोठ्यात दडून बसलेल्या बिबट्यापासून सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. या घटनेने येथील सर्व ग्रामस्थ भयभीत झाले होते. यानंतर रेस्कु ऑपरेशन राबवत गोठ्यात दडुन बसलेल्या बिबट्याला जेरबंद केले. मात्र हे सर्व मॉकड्रील होते हे माहित झाल्यावर ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. याप्रसंगी सरपंच, पोलीस पाटील, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी सर्व ग्रामस्थांनी सदर प्रात्यक्षिक बाबत आनंद व्यक्त करुन सरपंच यांनी वनविभागाचे आभार मानले.