इगतपुरीनामा न्यूज, दि. 22 ( सुनिल बोडके, त्र्यंबकेश्वर )
सध्या राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाने उग्र स्वरूप धारण केले आहे. कुठे बेड तर कुठे ऑक्सिजन कमतरता. कुठे कर्मचारी कमी पडत आहे. सगळीकडे अतिशय भयावह वातावरण आहे. त्र्यंबकेश्वर शहर व ग्रामीण भागात रुग्ण सापडत आहे. आपल्या भागातील लोकांना ऑक्सिजनची कमतरता पडू नये यासाठी त्र्यंबकेश्वरमधील तलाठी संघटना पुढे सरसावली आहे. त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार दीपक गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी संघटनेने त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रुग्णालयाला एक ऑक्सिजन कॉन्सेनट्रेटर मशीन भेट दिली आहे. तहसीलदार गिरासे यांनी तलाठी संघटनेचे विशेष कौतुक केले. संकटाच्या काळात आदिवासीबहुल भागातील सामान्य लोकांना याचा फायदा होणार असून आपले कार्य नेहमी लोकांच्या लक्षात राहील. यावेळी संघटनेने केलेल्या मदतीबद्दल आभार मानले.
आपण संकटाच्या काळात काय करू शकतो यावर संघटनेच्या तालुकाध्यक्षा वेळुंजे येथील तलाठी पल्लवी जाधव, जिल्हा सदस्य संजय पाटील यांच्या मनात मदतीची भावना तयार झाली. सध्या सर्वत्र ऑक्सिजनची कमतरता भासत असून आपण शासकीय रुग्णालयात ऑक्सीजन मशीन भेट दिली पाहिजे. यामुळे उत्तम पर्याय उभा राहील व रुग्णास त्याची मदत होईल. सगळ्यांनी होकार दिल्यानंतर वर्गणी करून एका तासात ऑक्सिजन पुरती रक्कम जमा केली व ती रक्कम ऑक्सीजन मशीनसाठी तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द केली.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात 124 महसुली गाव यात 19 तलाठी व 5 मंडळ अधिकारी यांची पदे आहे. संघटना छोटी का असेना पण संकट काळात संघटनेने लोकांना मदत म्हणून खारीचा वाटा उचलला आहे. याबद्दल त्यांचे आभार व्यक्त होत आहे.
यावेळी तलाठी संघटनेचे अध्यक्षा तलाठी पल्लवी जाधव, माजी अध्यक्ष मंडळ अधिकारी हेमंत कुलकर्णी, जिल्हा प्रतिनिधी संजय पाटील, विभागीय अध्यक्ष संतोष जोशी, मनोहर राठोड, ज्ञानेश्वर डोंगरे, सागर पवार, सुयोग वाघमारे, सत्यजित गोसावी, शरद खोडे, नवीन परदेशी, हेमराज चौधरी, पूनम घोडे, गुलाब चौधरी, कांचन पवार, अर्चना नाडेकर, रोहिणी मोंढे, ज्योती बहिरम, अर्चना बढे, भाग्यश्री धायतडक आदी उपस्थिती होते.