श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानतर्फे लोकसेवार्पण सोहळा संपन्न
इगतपुरीनामा न्यूज : अतिदुर्गम आदिवासी भागातील वंचित, कष्टकरी, गरीब आणि गरजू असणाऱ्या सर्वच रुग्णांना आरोग्याच्या विविध सुविधा एकच छताखाली मिळणार आहेत. लोकांच्या हृदयातील परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान नेहमीच अग्रेसर आहे. पालघर, जव्हार, हरसूल आणि लगतच असणारा गुजरातचा भाग, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक जिल्ह्याला स्वामी विवेकानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिटयूट वरदान ठरेल. अत्याधुनिक सुविधा असलेल्या ह्या रुग्णालयात सर्व आरोग्य सेवा आणि तज्ज्ञ डॉक्टर जनसेवेत दाखल झाले आहेत. रविवारी सकाळी त्र्यंबकेश्वर येथील तुपादेवी फाट्यावर श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान संचालित स्वामी विवेकानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिटयूटचा लोकसेवार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी विविध मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसेवार्पण कार्यक्रमावेळी अचानक आलेल्या जलधारा, लोकसेवेच्या अमृतधारा यांनी श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानच्या सेवाकार्याला सलामी दिली. उपस्थित नागरिक आणि मान्यवरांनी संस्थानच्या कार्याचे कौतुक करून आगामी काळात आवश्यक सहकार्य करणार असल्याचे सांगितले. संस्थानचे अध्यक्ष स्वामी श्रीकंठानंद, संस्थेचे सचिव स्वामी विश्वरूपानंद, भारत विकास परिषदेच्या संगीता जजोदिया, बी. के. अग्रवाल, सुरेंद्र गुप्ता, सीताराम पारिख, विजयकुमार अग्रवाल आदींनी दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ केला. ह्या कामासाठी योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांना श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानतर्फे स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले. सूत्रसंचालन प्राजक्ता कुलकर्णी यांनी तर स्वामी श्री कंठानंद यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप कुयटे, डॉ. जयेश ढाके, रोहन बोरसे आणि श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.