लोकसहभागातील रस्त्यामुळे कुऱ्हेगाव येथील शेतकऱ्यांचे जुने दुखणे मिटले : अधिकाऱ्यांनी केली रस्त्याची पाहणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ – इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव येथील विविध शेतकऱ्यांना उपयुक्त असलेल्या लोकसहभागातील रस्त्यामुळे येथील शेतकरी आनंदी झाले आहेत. गावाच्या आतापर्यंतच्या इतिहासात न सुटलेल्या ह्या रस्त्याचा जटील प्रश्न सोडवल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. शेतकऱ्यांनी लोकसहभागातून केलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी वाडीवऱ्हेचे मंडळ अधिकारी बाळासाहेब नवले, तलाठी कैलास अहिरे यांनी केली. लोकांनी एकत्र येऊन रस्त्याचे प्रश्न योग्य मार्गाने सोडवल्यास प्रशासकीय यंत्रणा सहकार्य करील असे ते म्हणाले. गावकऱ्यांनी रस्ता व्यवस्थित होण्यासाठी त्यावर श्रमदान करून दगड व मुरूम टाकण्यात आला.   

कुऱ्हेगाव शिवारातील रस्त्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी शिवसेनेचे भाऊसाहेब धोंगडे यांनी पुढाकार घेतला. आगामी काळात अनेक विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भाऊसाहेब धोंगडे म्हणाले. प्रगतशील शेतकरी गंगाराम आप्पा धोंगडे यांनी सांगितले की, सरपंच संगीता धोंगडे यांचा कार्यकाळ सुरु झाल्यापासून अनेक ग्रामविकासाची कामे झाली आहेत. रस्त्याचा सुटलेला प्रश्न त्यातील सर्वोच्च काम असून पुढेही त्या गावासाठी झटणार आहे असे ते शेवटी म्हणाले. ज्येष्ठ शेतकरी मधुकर पांडुरंग धोंगडे म्हणाले की, वर्षानुवर्षे शेतीचे आणि रस्त्याचे प्रश्न सगळीकडे आहेत. मात्र कुऱ्हेगाव येथील शेतकऱ्यांनी आपली एकी दाखवून हा प्रश्न सोडवल्याचा अभिमान वाटतो. यापुढेही असेच सहाय्य करून सर्वांनी भविष्य उज्वल करावे असे मोलाचे मार्गदर्शन केले. शेतकरी त्र्यंबक ( गंगाराम ) धोंगडे, शिवसेनेचे विष्णू धोंगडे, ज्येष्ठ शेतकरी मधु पांडुरंग धोंगडे, राजाराम धोंगडे, रोहिदास धोंगडे, उत्तम मुसळे आदी शेतकऱ्यांनी सर्वांचे आभार मानले.

Similar Posts

error: Content is protected !!