कृपेची सावली.. भक्तांची माऊली : बेलगाव तऱ्हाळे येथील श्री अंबिका माता

शब्दांकन :  पांडुरंग वारुंगसे, बेलगाव तऱ्हाळे

नवसाला पावणारी, संकटी धावणारी आणि भक्तांना तारणारी आदिशक्ती श्री अंबिका माता ही बेलगाव तऱ्हाळे ग्रामस्थांची आराध्य देवता आहे, प्राचीन काळापासून भक्तांवर कृपाशीर्वादाची पखरण घालणाऱ्या या अंबिका मातेचा महिमा अगाध आहे. म्हणूनच बेलगाव आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांचे श्री अंबिका माता हे श्रद्धा स्थान आहे. तऱ्हाळ्या डोगराच्या कुशीत आणि दारणा माईच्या तीरावर वसलेल्या बेलगावच्या दक्षिणेला अंबिका मातेचे मंदिर आहे. पूर्वजांनी बांधलेले चिरेबंदी दगडात भिंती आणि कौलारू छप्पर असलेले मंदिर अस्तित्वात होते. पाषाणात कोरलेली हेमाडपंथी शिल्पा कृतीची अंबिका मातेची तेजस्वी मूर्ती दगडी आसनावर विराजमान होती. हेमाडपंथी कलाकुसर कोरलेली पाषाणाची चौकट मंदिराची प्राचीनता दर्शवते. मंदिर समोर अन्य देवतांच्या सिंदूर चर्चित पाषाण मूर्ती स्थित आहेत.

रोगराई आणि इडा पीडा यांचा नाश करून गावाचा सदैव प्रतिपाळ करणाऱ्या या जागृत देवतेच्या जुन्या मंदिराचा सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यातून आणि भाविक भक्तांच्या योगदानातून मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. आर सी सी मध्ये सिमेंट काँक्रीटचे भक्कम स्वरूपाचे मंदिर हिरव्यागार माळरानावर दिमाखात उभे आहे. मंदिरावर विविध कलाकुसर केलेल्या कमानी तसेच फुल पाकळ्यांच्या नक्षीकाम केलेल्या डेरेदार धुमटावर सूर्य किरणांनी झळकणारा कळस शक्ती भक्तीची प्रेरणा देतोय. मंदिरातील जुन्या मूर्तीच्या जागी श्री अंबिका मातेची नूतन मूर्ती स्थापित आहे. व्याघ्र आसनावर बसलेली एका हाती खड्ग धारण करून एक हात भक्तांच्या रक्षणासाठी स्थित असलेली श्री अंबिका मातेची सात्विक तेजस्वी मूर्ती मंदिर गाभाऱ्यात आसनावर संगमरवरी दगडाच्या कलाकुसरीच्या मखरात विराजमान आहे.

माहे पौर्णिमेला देवीची जत्रा भरते. ही परंपरा खूप जुनी आहे. बेलगावची जत्रा म्हणजे पंचक्रोशी आणि गावकऱ्यांचा आनंदोत्सव! जत्रेच्या आदल्या रात्री देवीचा चांदीचा मुखवटा सुवर्ण अलंकार आणि चोळी पातळ गावातून वाजत गाजत मंदिराकडे नेतात यावेळी अंबा माता की जय या जयघोषाने गाव आणि परिसर दणाणून जातो. मंदिरात जागर गोंधळाच्या गजरात देवीचा विधिवत अभिषेक पूजा करून अलंकार चढविले जातात देवीला चोळी पातळ नेसवून खणा नारळाने ओटी भरण केले जाते आगरबत्याचा सुगंधी दरवळ… शुद्ध तुपात तेवणाऱ्या समयामधील पंचज्योति… कापराचा सुवास.. फुल हारांचा मधुर सुगंध… गोंधळ्यांच्या संबळांचा नाद…तुंतुण्याचा सूर… झांजेचा झंकार… आणि गोंधळ्यांच्या  मुखातून निघालेले जयघोष…. उदे ग अंबे उदे तुझा जागर मांडला गोंधळा ये… या नादघोषाने सारे वातावरण भाव भक्तीत न्हाऊन निघते. यावेळी शोभायमान मखरात विराजमान असलेल्या जगत माता अंबिका मातेचे सात्विक रूप अधिकच खुलून दिसते. दुसऱ्या दिवशी ( माहे पौर्णिमा ) यात्रा भरते.

यावेळी सर्व गावकऱ्यांच्या आनंदाला उधाण येते. देवीच्या मंदिरात दिवसभर पूजा विधी प्रसाद सुरू असतात. नोकरी धंद्याच्या निमित्त बाहेरगावी असलेले गावातील गावकरी यावेळी आपल्या कुटुंब कबिल्यासह आपल्या मायभूमीत येतात देवीच्या चरणकमलांवर नतमस्तक होतात तिची करुणा भाकतात, खणानारळाने ओटी भरतात, दीप माळेत तेल जाळतात आणि आपल्या हृदयाच्या ओंजळीत देवीचा आशीर्वाद भरभरून नेतात. दिवसभर गावातील आणि पंचक्रोशीतील भाविकांची मंदिरात अलोट गर्दी दाटते. मंदिर परिसर माणसांच्या गर्दीने फुलून निघतो. देवीच्या जागरणानिमित्त रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम असतो. पूर्वी गावोगावचे तमाशाचे फड या जत्रेत हजेरी लावीत असत. तमाशा शौकीन आणि कला प्रेमी मंडळींना ही आनंदाची पर्वणी असायची. गण, गवळण, फार्स, लावण्या, सवाल जबाब आणि वगनाट्य या रात्रभर चालणाऱ्या कलाकारीत रसिक मंडळी रंगून जात. पुढे जमाना बदलत गेला जुने कला प्रकार मागे पडले. यात्रेच्या मनोरंजनात पडद्या वरच्या चित्रपटांनी वर्णी लावली पुढे नारायणगाव सारख्या ठिकाणांचे तुकाराम खेडकर या प्रसिद्ध तमाशांच्या फडांनी बेलगावच्या यात्रेत हजेरी लावली कारण फक्त एकच या निमित्त सर्वांनी एकत्र येऊन देवीच्या स्मरण सहवासात जागरण करणे! असे सांगतात की तमाशा सम्राट दत्ता महाडिक पुणेकर यानी आपल्या तमाशाचा प्रथम कार्यक्रम याच देवीच्या यात्रेत सादर केला. येथेच त्यांना अंबिका मातेचा कृपा आशीर्वाद प्राप्त झाला.

तदनंतर महाराष्ट्रभर या तमाशाच्या कीर्तीचा झेंडा फडकत राहिला. पूर्वी या यात्रेत एकट्याने बारा बैलगाड्या ओढण्याचा कार्यक्रम होत असे. दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात येत असे. यावेळी गावोगावचे कुस्ती क्षेत्रातील पहिलवान या ठिकाणी येऊन बेलगावच्या तांबड्या मातीत आपले कुस्ती क्षेत्रातील कसब दाखवीत. यात्रा कमिटीच्या वतीने विजयी पहिलवान यांना भरघोस बिदागी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. यात्रेची ही परंपरा आजतागायत आहे. दरवर्षी अंबिका मातेचा यात्रा उत्सव गाव वर्गणीतून साजरा करण्यात येतो. जुन्या जाणत्या मंडळींच्या व थोरा मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा कमिटी या कार्यक्रमाचे नियोजन करते. यात्रेच्या दिवशी रात्री गावातील मानाची खंडोबाची “देवकाठी ” वाजतगाजत श्री खंडोबा मंदिरात ( पाउतका ) भेटविली जाते. ही परंपरा कायम आहे. यात्रेच्या दिवशी साऱ्या गावात आनंदाचे भक्तीचे आणि उत्साहाचे वातावरण असते. घरा घरातून पक्वान्नांचा सुगंध दरवळत असतो. बाहेरगावी असलेले गावकरी बांधव या निमित्त एकमेकांना भेटतात. आपल्या मायभूमीत हा भक्ती सोहळा एकत्र येऊन साजरा करण्याचे क्षण प्रत्येक जण आपल्या हृदयात जपून ठेवतात. मोकळ्या माळरानावर आकर्षक रंग रंगोटी केलेल्या मंदिरावरील नेत्रदीपक रोषणाईने सारा परिसर उजळून निघतो. निळ्याशार आकाशात पौर्णिमेच्या टपोरा चंद्राच्या शितल प्रकाशात उपस्थित भाविकांच्या हृदयात भाव भक्तीची कमळ फुले उमलतात. त्या चंद्राचे आणि टपोऱ्या तारकांचे प्रतिबिंब दारणेच्या निळ्याशार संथ पाण्यात पडलेले असते. जणू आकाशातील तारका ही या यात्रेला खाली उतरल्याचा भास होतो हा दैवी नजारा प्रत्येकाच्या हृदय गाभाऱ्यात झिरपत जातो. रोगराई ईडा पीडाला दूर ठेवून गावाचं गुरा ढोरांचं, पीक पाण्याचं रक्षण करणारी, समृद्धी सुख आणि आशीर्वादाची मुक्त हस्ते उधळण करणारी जगद्ग माता श्री अंबिका मातेचा पूर्वापार अगाध महिमा बेलगावकरांच्या हृदय मंदिरी चिरकाल आहे !

गावकऱ्यानी जपून ठेवलेल्या प्राचीन संस्कृतीच्या अनेक शिल्पाकृती बेलगावात जागो जागी आढळतात, चालुक्य राजाच्या ताम्रपटात “बेलग्रामचा” उल्लेख आढळत असल्याने ते गाव हेच असल्याची शक्यता वाटते.
सुमारे बाराशे वर्षापूर्वीच्या अनेकानेक प्राचीनतेच्या अज्ञात होऊन पडलेल्या पाऊलखुणा या गावात आढळतात. सातवाहन साम्राज्य नष्ट झाल्यावर बदामी चालुक्य राजा पुलकेशी ( दुसरा ) पैकी विक्रमादित्य आणि चंद्रादित्य उर्फ नागवर्धन राज्यांच्या साम्राज्यातील काही ताम्र पटांच्या माध्यमातून नागवर्धनाचे  बेलगाव तर्हाला असे उल्लेख आढळून येतात. त्याच परंपरेला अनुसरून आज पर्यंत बेलगावात  शक्ती …भक्ती …संस्कृती च्या जपून ठेवलेल्या सात्विक परंपरा  गावातील साजऱ्या  होणाऱ्या लोकउत्सवातून दिसून येतात. नवरात्र उत्सवात मंदिराला विद्युत रोषणाई केली जाते. सर्व गावकरी देवी मंदिराच्या प्रांगणात घट बसवितात नऊ दिवस पूजा आरती केली जाते. गावातील हौशी मंडळी रोज रात्री देवी मंदिरात देवीची भक्ती गीतं गातात. दसऱ्याच्या दिवशी देवीला सीमोल्लंघनाचे सोनं अर्पण करून भक्ती भावाने नतमस्तक होतात !

Similar Posts

error: Content is protected !!