लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ – वनविभागात काम करणे अतिशय धोकादायक आहे. जंगली भागात हिंस्र प्राण्यांपासून लोकांना संरक्षण आणि रात्री अपरात्री लोकवस्तीत कोणत्याही ठिकाणी बिबट्या निघाला तर वन अधिकाऱ्यांचे खरे काम सुरु होते. आकस्मिक कुठेही घटना घडल्यास तात्काळ जीवाची पर्वा न करता घटनेच्या ठिकाणी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी सर्वात आधी पोहोचतात. असेच धाडसी काम करणार इगतपुरीचे वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव ओळखले जातात. त्यांनी आपल्या वेगवेगळ्या कामांचा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्रहार सैनिक कल्याण संघाने इगतपुरी रत्नगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. भाऊसाहेब राव यांचे इगतपुरी तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
त्यांचे वडील बाजार समितीचे माजी सभापती गणपत राव यांनी दिलेले संस्कार जपून भाऊसाहेब राव अनेक कामांनी प्रसिद्ध आहेत. २३ वर्षापासून वनविभागात कार्यरत असूनही तरुणांना लाजवेल अशा प्रकारे जीव धोक्यात घालत धाडसी कामे केली आहेत. वन्यजीव संरक्षण, वनतळे, मृदु संधारण रोपवाटिका, वृक्ष लागवड, वन्यजीव जनजागृती, पशुधन नुकसान भरपाई मिळवून देणे आदी कामासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. भाऊसाहेब राव यांच्या वन तळ्याच्या कामांनी आदिवासी भागातील शेतीला पाणी आणि जमिनीची पाणी पातळी वाढण्याला मदत मिळाली आहे. अशा अनेक कामांनी त्यांनी आदिवासी भागात वेगळा ठसा निर्माण केला आहे. त्यांच्या कामाची प्रहार सैनिक कल्याण संघाने दखल घेऊन पुरस्कार दिला. त्यांच्या पुरस्काराबद्धल विविध क्षेत्रातील पदाधिकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.