इगतपुरीनामा न्यूज, दि. 26
मोडाळे गावाच्या सर्वांगीण विकासाठी लायन्स क्लबच्या संयोगाने योगदान देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन लायन्स क्लबचे अध्यक्ष अंकित अजमेरा यांनी केले. मोडाळे येथे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली लायन्स क्लबकडून 10 लाख किमतीचा सामाजिक सभागृह देण्यात आले. यामुळे मोडाळे आणि परिसरातील गावांत लग्न अथवा तत्सम समारंभ करण्यासाठी सर्वोत्तम सेवा दिली जाणार आहे. ह्या सभागृहाचे भूमिपूजन करताना अंकित अजमेरा यांनी गोरख बोडके यांच्या कार्याचे कौतुक केले. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे गावात जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अनेक कामे मार्गी लागत आहे. विकासाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गावात अनेक सुखसुविधा देण्यासाठी यश मिळाले आहे. गोरख बोडके यांच्या प्रयत्नातून आता मुंबई येथील लायन्स क्लब यांच्याकडून 10 लाखाचा सामाजिक सभागृह हॉल मिळणार असल्याने नागरिकानी लायन्स क्लब मुंबई यांचे आभार मानले.
याआधी लग्नसमारंभ आदी कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख यांच्या माध्यमातून शासकीय योजनेतून दोन सभागृह झालेले आहेत. ह्या कामामुळे ग्रामीण नागरिकांची मोठी सुविधा झाली आहे. भूमिपूजन कार्यक्रमावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष अंकित अजमेरा, माजी अध्यक्ष विजय खेतान, हितेन भाई आदी पदाधिकारी उपस्थित होते. लायन्स क्लबने यापूर्वी मोडाळे येथे माध्यमिक शाळा, अभ्यासिका आदी कामे पूर्ण केली आहेत. मोडाळे आणि परिसरातील नागरिकांना लग्नकार्यासाठी नाशिक, घोटी आदी ठिकाणी जावे लागत होते. आता सभागृह होणार असल्याने लोकांच्या पैशाची आणि वेळेची बचत होणार आहे. कार्यक्रमात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, सोसायटी पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.