इगतपुरीनामा न्यूज, दि. 21
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी आदेशित केले प्रमाणे जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन होण्यासाठी अवैधरित्या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण माधुरी केदार-कांगणे यांनी पथकास सुचना दिलेल्या आहेत. श्रीमती कांगणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे एक इसम घोटी ते नाशिक रस्त्याने अंमली पदार्थाची वाहतुक करणार असल्याचे समजले. त्यानुसार मुंबई आग्रा महामार्गावर गोंदे दुमाला येथे सापळा रचण्यात आला. बातमीप्रमाणे घोटीकडुन नाशिककडे यामाहा कंपनीची FZ मोटार सायकल नं. MH 15 HX 2599 येतांना दिसली. त्यावरील व्यक्तीने त्याचे नाव दर्शन अश्विनी कुमार सोलंकी वय २७ वर्षे, रा. श्रीरामवाडी, राखेचा हाऊस, घोटी मुळ रा. चोपासणी हौ. बोर्ड, जोधपुर, राजस्थान असे सांगितले
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, वाडीवऱ्हेचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांना माहिती देवुन घटनास्थळावर पाचारण करण्यात आले. डॉ. अर्जुन भोसले यांनी त्याच्या मोटार सायकलला अडकविलेली लाल रंगाची पिशवी हातात घेवुन पाहिले असता तिच्यात सिल्वर रंगाच्या प्लॅस्टिक पिशवीत अफुसदृष्य अंमली पदार्थ असल्याची खात्री केली. त्या इसमाच्या ताब्यातील १ लाख रुपये किमतीचा अफुसदृष्य अंमली पदार्थ व मोटारसायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दर्शन अश्विनी कुमार सोलंकी याचेविरूद्द पोलीस नाईक संदीप हांडगे यांच्या
फिर्यादीवरून वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या सुचनांप्रमाणे वं अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार- कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, पोलीस नाईक संदीप हांडगे, भाउसाहेब टिळे, पोलीस शिपाई कुणाल वैष्णव यांनी ही कारवाई केली आहे. जिल्ह्यातील अंमली पदार्थ तस्करी, अवैध धंदे, अवैध वाहतुकीचे समुळ उच्चाटन होण्यासाठी आगामी काळात सतत कारवाई सुरू राहणार आहे.