इगतपुरीनामा न्यूज, दि. 12
मोठी स्वप्न आणि त्या स्वप्नासाठी अविरत कष्ट घेण्याची तयारी असल्यास कोणतेही मोठे उद्धीष्ठ पूर्ण व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. ग्रामीण भागातील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना मोडाळे येथील अभ्यासिकेमुळे देशाच्या आणि राज्याच्या सेवेतील उच्च अधिकारी होण्याची संधी आहे. यासाठी गोरख बोडके आणि आम्ही अधिकारी आपल्या सर्वांच्या पाठीशी आहोत. स्पर्धा परीक्षाद्वारे सुलभ यश मिळवण्यासाठी आपल्या क्षमतांचा विकास करून निर्विवाद यशाचे मानकरी व्हा. यश तुमचेच असून ह्याच यशाचा उत्सव करण्यासाठी आपण पुन्हा नक्की भेटू असा यशाचा मंत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य तथा नाशिक परीक्षेत्राचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. ग्रामविकासाच्या नव्या मोडाळे पॅटर्नमुळे ह्या गावाची उच्चतम ओळख महाराष्ट्राला झाली आहे. याचे शिल्पकार असणारे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांच्या विविध उपक्रमाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे असा गौरव यावेळी त्यांनी केला. ३० हजाराची विविध उपयुक्त पुस्तके मोडाळे गावाला देण्याचे त्यांनी यावेळी घोषित केले.
इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथे मोफत क्रिकेट टर्फचा शुभारंभ डॉ. प्रताप दिघावकर यांच्या हस्ते झाला. यामध्ये क्रिकेट, बॅडमिंटन, हॉलीबॉल हे खेळ खेळण्याची सर्वोत्कृष्ट व्यवस्था झाल्याचे कौतुक डॉ. दिघावकर यांनी केले. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांच्या संकल्पनेनुसार मोडाळे गाव विकासाचा नवा पॅटर्न उभा करीत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी उद्योजक सुहास गिरी, जितु शहा, बालविकास प्रकल्पाधिकारी पंडित वाकडे, विनोद नाठे, ग्रामसेवक नानासाहेब खांडेकर, सरपंच राहुल बोंबले, हरीश चव्हाण, सचिन लंगडे, सुरज कातोरे आदी उपस्थित होते. सामाजिक जाणीव आणि संवेदना जपून स्पर्धा परीक्षामधील यशवंत विद्यार्थ्यांनी जनतेची सेवा करण्याचे व्रत धारण करावे. व्यक्तिमत्व विकास आणि सुसज्ज अभ्यासिका यामुळे निश्चितच विद्यार्थी हिमालयापेक्षा मोठे यश संपादन करतील असा आशीर्वाद डॉ. दिघावकर यांनी शेवटी दिला. याप्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक, शिक्षक, विद्यार्थी, पदाधिकारी उपस्थित होते.