इगतपुरीनामा न्यूज, दि. 31
शिक्षक ध्येयतर्फे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२२’ ही राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धा आयोजन करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या कला असतात, त्यातील एक कला म्हणजे ‘चित्रकला’ होय. सुंदर, सुबक चित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या कलेला उत्तेजन देणे, त्यांची सुप्त कला राज्यातील इतर विद्यार्थ्यांसमोर आणणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील कलाकार वृत्ती वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.
इयत्ता पहिली ते पाचवी गट अ साठी माझा आवडता पक्षी, निसर्ग चित्र, मी दिवाळीत किल्ला बनवतो हे विषय आहेत. इयत्ता सहावी ते दहावी गट ब साठी माझा आवडता प्राणी, गावची जत्रा, मी दिवाळीत फटाके फोडतो हे विषय आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या गटासाठी दिलेल्या तीन विषयांपैकी फक्त एकाच विषयावर चित्र काढायचे आहे. त्यासाठी प्रथम A4 आकाराचा कागद घ्यावा. चित्र काढून पूर्ण झाल्यावर त्या चित्रास सुबक रंग द्यायचा आहे. रंग कोणत्याही प्रकारचे वापरु शकता. आपल्याकडे उपलब्ध आहे ते रंग वापरून चित्र छानपैकी स्वतः रंगवायचे आहेत. विद्यार्थ्यांनी हे चित्र स्वतः काढायचे आहे. चित्र पूर्ण झाल्यानंतर त्या चित्राचा मोबाईलमध्ये एक छानसा फोटो काढायचा आहे. तो फोटो shikshak.dhyey@gmail.com या ईमेल आयडी वर पाठवायचा आहे. चित्राचा फोटो जमा करण्याची अंतिम तारीख ५ नोव्हेंबर २०२२ आहे.
अ आणि ब गटातील २० उत्कृष्ठ चित्रांना पारितोषिक दिले जाईल त्यात सन्मानचिन्ह आणि प्रिंट प्रशस्तीपत्र दिले जाईल. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. ऑनलाइन चित्रकला स्पर्धेच्या अधिक सविस्तर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https://kaushalyavikas.blogspot.com या वरील संकेतस्थळाला भेट द्यावी. राज्यातील चित्रकला शिक्षक यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेविषयी सविस्तर माहिती द्यावी आणि सकारात्मक विचारसरणी ठेऊन या स्पर्धेत आपल्या विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवावा, असे आवाहन ‘शिक्षक ध्येय’ चे संपादक मधुकर घायदार आणि संपादकीय मंडळ यांचे तर्फे करण्यात आले आहे.