हेच का ‘तुमचं‘ लोककल्याणकारी राज्य? हेच सामान्यांचे गरिबांचे सरकार? – भाऊसाहेब चासकर
दुर्दैव आहे की मुलांना त्यांच्या वाडी-वस्तीतल्या शाळा चालू राहण्यासाठी आंदोलने करावी लागत आहेत. शाळा सुरू ठेवायच्या मागणीसाठी, शिकायला मिळावे यासाठी लहान मुलांना पायी मोर्चा काढायला लागणं किती वेदनादायक आहे! या पृष्ठभूमीवर ‘सकाळ‘चे संपादक सन्मित्र सम्राट फडणीस यांनी लिहिलेली खालील नोंद महत्त्वाची आहे. शिक्षकांबद्दल तक्रारी असतील. त्याबद्दल गुणवत्तेबद्दल स्वतंत्र बोलू. मात्र कायदा मोडून सरकार शाळा बंद करत आहे. त्याविषयी समाजातील जाणत्या जनांनी बोलायला हवे. जनतेच्या शाळा वाचवण्यासाठी जनतेने पुढाकार घेतला पाहिजे. हेच का ‘तुमचं‘ लोककल्याणकारी राज्य? हेच सामान्यांचे गरिबांचे सरकार? हे ठासून विचारले पाहिजे...!
शाळाबंदी मागे घ्या.
- भाऊसाहेब चासकर, शिक्षक आणि शिक्षण कार्यकर्ता
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातली दरेवाडीची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रशासनाने बंद केलीय. तिथले विद्यार्थी आणि पालक आज नाशिक जिल्हा परिषदेत पायी निघालेत, असा मेसेज भाऊसाहेब चासकर यांनी केला. या फोटोतली मुलं बघून कालवाकालव झाली. पटसंख्या वगैरे निकष ठिकंयत; पण निकषांना तारतम्यही पाहिजे. शाळा म्हणजे काय दुकानदारी नाही. अमुक इतका माल खपलाच पाहिजे, नाहीतर दुकान बंद, असलं शिक्षणात नसतं; नसावं.
“शाळा नाही, तर शेळी द्या, दप्तर नसेल तर बकऱ्या द्या”, असला फलक हातात धरण्याची वेळ या मुलांवर आणणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि अशा निर्णयाला विरोधही न करणाऱ्या राजकीय नेत्यांना स्वतःची लाज वाटायला हवी. ही घटना विशिष्ट शाळेच्या संबंधानं आहे, म्हणून अस्वस्थता नाहीय. शिक्षण परवडेनासं होत चाललं असतानाच्या आजच्या काळात सरकारी मालकीची एक शाळा गमावणं म्हणजे शंभर-पन्नास मुला-मुलींना अंधारात ढकलणं आहे. इगतपुरीत घडतंय, आपला काय संबंध असं म्हणून गप्प बसून राहिलो तर उद्या ते आपल्या गावातही पोहोचणार आहे. “गावात घडतंय, आपला काय संबंध,” असं म्हणून गप्प बसून राहिलो तर उद्या ते तुमच्या शहरातही पोहोचणार आहे. उद्याची पिढी वाचवायची असली, तर आजचं सरकारी शिक्षण बंद पडू देता कामा नये. पोरांनी हातात धरलेल्या फलकावरच्या मजकुराचा अर्थ त्यांना माहितही नसेल कदाचित. आपल्याला माहितीय, तर सावध राहिलं पाहिजे. – सम्राट फडणीस, संपादक दै. सकाळ पुणे ( फेसबुकवरून साभार )