इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०
इगतपुरी तालुक्यातील जानोरीच्या बोराडे कुटुंबातील सोनाली आणि रितेश चंद्रभान बोराडे हे दोघे राष्ट्रीय जिम्नॅस्टिक खेळाडू आहे. या दोघांची निवड भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी झाली. परंतु त्यासाठीचा ३ लाख २८ हजार खर्च करणे त्यांना शक्य नव्हते. त्यांनी मदतीसाठी पुढे येऊन मदत करा असे आवाहन केल्याची बातमी मनविसे जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते यांना समजली. यानुसार त्यांनी आपण तालुक्यातुन मदत मिळवुन देऊ असे त्यांना सांगितले. आत्माराम मते, गणेश मुसळे आणि पत्रकार भास्कर सोनवणे यांनी इगतपुरी तालुक्यातील जनतेला मदतीसाठी आवाहन केले. त्याप्रमाणे अनेक दानशुर नागरिकांनी आर्थिक मदत केली.
सोनाली व रितेष हे आपल्या तालुक्यातील असुन हा आपला अभिमान स्वाभिमानच आहे. त्यांना जास्तीत जास्त मदत मिळवुन देण्याचा आमचा मानस आहे. भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांना नाशिक जिल्हाच्या वतीने आमच्या शुभेच्छा आहेच. ते आपल्या गावासह तालुक्याचे आणि जिल्हाचे नाव मोठे करतील यात कुठलीही शंका नाही.
- आत्माराम संपत मते, जिल्हा उपाध्यक्ष मनविसे नाशिक
इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, ग्रामपंचायत पाडळी देशमुख, ग्रामपंचायत जानोरी यांनी प्रत्येकी ११ हजारांची मदत केली. ग्रामपंचायत गोंदे दुमाला, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, खरेदी विक्री संघांचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, मनसेच्या स्वागता उपासणी, कामिणी दोंदे, आत्माराम मते, सह्यादी संस्थेचे संदीप तांबे, दिलीप जाधव, आत्माराम फोकणे, तुकाराम सहाणे, विलास भोर, अनिल मुसळे, धनाजी भोर, रूपाली बिडवे आदी नागरिकांनी आर्थिक मदत केली. आतापर्यंत ६५ हजार ५०० रूपये मदत मिळाली आहे. अजुनही मदतीची गरज असून आत्माराम मते यांच्यासह पदाधिकारी यासाठी सहकार्य करीत आहे. बोराडे कुटुंबाने सर्वांचे आभार मानले आहेत. त्यांची स्पर्धा २३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत कझाकिस्तान येथे होत आहे. मदतीसाठी पत्रकार भास्कर सोनवणे, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते, विधानसभा अध्यक्ष गणेश मुसळे यांचे मोठे सहकार्य लाभले.