मविप्र संचालक निवडणुकीसाठी त्याच तालुक्यातील सभासदांना आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार द्यावा : अन्य तालुक्यातील बहुसंख्य मतदारांची एकाधिकारशाही थांबवावी

मविप्रच्या भावी सरचिटणीसांकडे संस्थेची घटनादुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न करणार : ॲड. दिनकर खातळे

इगतपुरीनामा न्यूज, दि. 28

मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक ह्या अग्रगण्य शैक्षणिक संस्थेचे इगतपुरी तालुक्यात अवघे 138 सभासद आहेत. जिल्ह्यातील एकंदर सभासद संख्या 10 हजारांच्या आसपास आहे. संस्थेच्या घटनेनुसार प्रत्येक तालुक्याला 1 संचालकपद दिले गेले आहे. तथापि त्या त्या तालुक्यातील सभासदांना आपल्या तालुक्याचा संचालक निवड करतांना अन्य तालुक्याच्या संचालक पदावरील उमेदवारांना मतदान करावे लागते. इगतपुरी तालुक्यात 138 सभासदांना सर्व पॅनल फक्त गृहीत धरत असतात. म्हणून त्या त्या तालुक्यातील सभासदांना फक्त त्याच तालुक्यातून उभे असलेल्या उमेदवाराला मतदान करण्याचा अधिकार प्राधान्याने देणे आवश्यक आहे. इतर पदांसाठी मात्र मतदान देण्याचा अधिकार असला पाहिजे. सुरु असलेल्या निवडणुकीनंतर भावी सरचिटणीस यांच्याकडे मविप्रच्या घटनेत दुरुस्ती करण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे अशी माहिती ॲड. दिनकर संतुजी खातळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

इगतपुरी तालुक्यात संस्थेच्या फक्त 138 सभासदांना मतदान करण्याचा अधिकार असून अन्य तालुक्यातील मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील संचालकपदासाठी उभे असलेल्या उमेदवारांना अन्य तालुक्यातील सभासद बहुसंख्येने मतदान करत असतात. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील सभासदांचे हित ध्यानात घेऊन मविप्रची घटनादुरुस्ती होणे अत्यावश्यक ठरते असेही ॲड. दिनकर संतुजी खातळे यांनी सांगितले.

ॲड. खातळे पुढे म्हणाले की, मविप्र संस्थेच्या घटनेनुसार अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापती, सरचिटणीस आणि चिटणीस अशी पदे आहेत. यासह प्रत्येक तालुक्याला संचालकपद देण्यात आले आहे. संचालक पदासाठी सर्व सभासदांचे मतदान असते. इगतपुरी तालुक्यातील मतदार अतिशय कमी असल्याने निवडणुकीत त्यांना गृहीत धरले जात आहे. ह्या निवडणुकीत सर्वाधिक जास्त लक्ष फक्त निफाड तालुक्यात केंद्रीत केले जाते. अशा परिस्थितीत संबंधित तालुक्याच्या सर्व मतदारांना त्यांच्याच तालुक्यातील संचालक पदाच्या उमेदवारांना मतदान करण्याचा अधिकार देणे अत्यावश्यक आहे. इतर तालुक्यातील मतदारांचा अन्य तालुक्यातील संचालकांसाठी मतदान देण्याचा अधिकार काढून टाकणे न्यायिक ठरणार आहे. संचालक सोडून इतर सर्व पदांसाठी जिल्ह्यातील सर्वांनाच मतदान देण्याचा अधिकार अबाधित ठेवला जायला हरकत नाही. यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक ह्या संस्थेच्या घटनेत पूर्वलक्षी प्रभावाने घटनादुरुस्ती करावी यासाठी भावी सरचिटणीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात येईल असे ॲड. दिनकर खातळे यांनी शेवटी सांगितले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!