धामणगाव येथील २६ वर्षीय महिलेचा विहिरीत पडून मृत्यू : घोटी पोलिसांकडून तपासकार्य सुरु

एकनाथ शिंदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २९

इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील कातकरी समाजातील २६ वर्षीय गरोदर महिलेचा आज दुपारी साडेचारच्या दरम्यान विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यमुना वाघ असे दुर्दैवी महिलेचे नाव आहे. तिला 5 वर्षाची मुलगी असून ती आठ महिन्याची गर्भवती होती. घोटी पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन तपास सुरु केला आहे.

धामणगाव येथील सार्वजनिक विहिरीतून पिण्याचे पाणी भरण्यासाठी ही महिला आली होती. मात्र ती अचानक विहिरीत पडल्याचे ग्रामस्थ सांगतात. ह्या घटनेची माहिती येथील उपसरपंच शिवाजी गाढवे, तुकाराम कोंडूळे,धोंडीराम गुंजाळ यांनी घोटी पोलिसांना तात्काळ कळविली. घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. यमुना वाघ ही भाऊ सुनील त्र्यंबक मुकणे यांच्याकडे राहत होती. जीवरक्षक गोविंद तुपे यांनी बुडालेल्या महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाढवे यांनी याकामी रुग्णवाहिकेची सुविधा करून दिली.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!