इगतपुरी तालुक्यात प्रथमच ६ कोटी २५ लाखांच्या सीएसआर निधीतुन गरिबांच्या घरी दिवाळी
इगतपुरीनामा न्यूज, दि. २६
वर्षानुवर्षे हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांचा स्वप्नभंग होतो. अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असतांना संपूर्ण आयुष्य घराचे फक्त संकल्पचित्र डोळ्यांसमोर असते. अशा अनेक कुटुंबांची हयात फक्त घर ह्या विषयाभोवती फिरत असते. अशा अनेक कुटुंबाच्या स्वप्नातले घर आता प्रत्यक्षात आकाराला येणार आहे. हॅबीटेट इंडिया आणि निर्माण ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने इगतपुरी तालुक्यातील 125 गरजू कुटुंबांना प्रत्येकी 5 लाखांचे आरसीसी बांधकाम, सौरऊर्जा आणि आधुनिक सुविधा असणारे घर बांधून दिले जाणार आहे. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे, शिरसाठे, कुशेगाव आणि वाकी बिटूर्ली ग्रामपंचायत अंतर्गत अत्यंत गरजू 125 लाभार्थी निवडण्यात आले आहेत. ह्या घरांचा शुभारंभ मोडाळे येथे आज भरगच्च कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात घरांचे भूमिपूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 125 गरीब कुटुंबातील लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार असल्याने त्यांच्या डोळ्यांत यावेळी आनंदाश्रू उभे राहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी केले.
हॅबीटेट इंडिया आणि निर्माण ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मोडाळे, शिरसाठे, कुशेगाव आणि वाकी बिटूर्ली ह्या गावातील 125 गरीब कुटुंबांना हक्काचे आणि सुंदर घर बांधून दिले जाणार आहे. प्रत्येकी 5 लाखाप्रमाणे 6 कोटी 25 लाख रुपयांचा हा प्रकल्प आहे. कंपनीतर्फे लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यावर रक्कन न देता स्वतः कंपनीचे तज्ज्ञ पथक आरसीसी बांधकाम, सौर ऊर्जा आणि इतर अनेक सुविधा प्रत्येक घरासाठी करून देणार आहेत. येत्या सहा महिन्यात संपूर्ण घरे पूर्ण करून लोकार्पण केली जाणार आहेत. इगतपुरी तालुक्यात आतापर्यंतचा हा सर्वाधिक मोठा प्रकल्प असून ह्या प्रकल्पामुळे गरिबांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
मोडाळे येथे प्रतिनिधिक स्वरूपात आज झालेल्या कार्यक्रमात लाभार्थ्यांना घराचे प्रतिकात्मक चित्र मान्यवरांनी सुपूर्द केले. घराचे भूमिपूजन करून लाभार्थ्यांची भेट घेण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंपनीचे जस्टीन सर होते. त्यांनी आपल्या भाषणात लाभार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी कंपनीचे अधिकारी राजीव सर, रमेश सर, नायक सर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रसंगी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी कंपनीने हाती घेतलेल्या महत्वपूर्ण कार्याचे कौतुक करून गरिबांच्या जीवनात उन्नती साधण्यासाठी हा प्रकल्प मौलिक असल्याचे कौतुक केले. कार्यक्रमाला विस्ताराधिकारी संजय पवार, ग्रामसेवक हनुमान दराडे, ग्रामसेविका ज्योती शिंदे, सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व लाभार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.