लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २३
आदिवासी समाज हा निसर्गपूजक आहे. त्यांचे देव, भाषा आणि चालीरीती अन्य ग्रामीण आणि शहरी लोकांपेक्षा भिन्न आहेत. निसर्गाच्या सानिध्यात त्यांचे जीवनचक्र गुंफलेले असल्याने त्यांच्यामध्ये लढाऊपणा ओतप्रोत भरलेला असतो. एकतेचा धागा मनाशी घट्ट करून मोठ्या उत्साहात जागतिक आदिवासी दिन साजरा करा असे आवाहन इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी केले. घोटी येथे आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर नियोजन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. इगतपुरी तालुका आदिवासी समन्वय समितीने 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त कोणकोणते कार्यक्रम, उपक्रम राबवावे याबाबत माजी आमदार शिवराम झोले, पांडुरंग बाबा गांगड, माजी सभापती गोपाळा लहांगे यांनी सविस्तर चर्चा केली. कोविड महामारीमुळे मागील आदिवासी दिन घरातच साजरा केला होता. या महामारीने संपूर्ण जग व्यापलेले होते. आदिवासीही त्या संसर्गापासून सुटलेला नाही. मात्र अंगभूत शक्तीच्या जोरावर त्यांनी त्याच्यावर मात केलेली आहे. समाजाप्रती असलेली बांधिलकी आजही आदिवासी बांधव जपताना दिसतो आहे असेही आमदार खोसकर यांनी सांगितले.
याप्रसंगी संतोष रौंदळे, तुकाराम वारघडे, गणेश गोडे, डॉ. जयंत कोरडे, काशिनाथ कोरडे, पंडित खेताडे, अरुण खतेले, कैलास घारे, हिरामण कौटे, नवनाथ लहांगे, किसन कोरडे, रवी अस्वले, शरद बांबळे, सुनील भारती, भास्कर जोशी, रोशन भांगे, तानाजी भांगरे, रमेश शिंदे, नामदेव लोहरे, गणेश घोटकर, बाळा डहाळे, शांताराम भांगे, साहेबराव बांबळे, सुनील भारती, अनिल गभाले आदी बांधव उपस्थित होते. आमची संस्कृती, आमचा अभिमान,… मी आदिवासी…, माझा स्वाभिमान’ अशी परंपरा असलेली आदिवासी कला सातासमुद्रापार पोहोचली आहे. जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध लोककलेतून आदिवासी संस्कृती टिकवण्याचा संदेश देण्यात येणार आहे. आदिवासी बांधवाच्या जीवन पद्धती, चालीरीती, रुढी परंपरा, वादन, गीते, लोककथा, कला यांचाही कार्यक्रमात आढावा घेण्यात येईल प्रतिक्रिया माजी सभापती गोपाळा लहांगे यांनी दिली.