इगतपुरीनामा न्यूज, दि. 7
घोटी आणि इगतपुरी शहरातील नागरिकांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. दोन्ही शहरात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत इगतपुरी शहरात 30 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आणि घोटी शहरातही 30 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ही दोन्ही शहरे वगळता ग्रामीण भागात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले नसल्याचे दिलासादायक चित्र आहे. इगतपुरी तालुक्यात आज दिवस अखेर 420 कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. शासनाने घोषित केलेल्या मिनी लॉकडाऊनमुळे 2 दिवसांपासून ग्रामीण भागातील रुग्णांचा आकडा कमी झाल्याचे दिसते आहे. मात्र शहरी भागातील इगतपुरी आणि घोटी येथे एकंदरीत 60 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. दोन्ही शहरांसह ग्रामीण भागातील नागरिकांनी अधिकाधिक काळजी घेण्याची गरज असून कोरोनाची संक्रमण साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहाय्य करणे अत्यावश्यक आहे. कोरोनाचे लसीकरण सुद्धा वेगाने सुरू असून 45 वयाच्या पुढील नागरिकांचा प्रतिसाद वाढला आहे.
अहवाल येईपर्यंत रुग्णांना घरी सोडू नये !
ज्यांच्या स्वॅबची तपासणी सध्या केली जाते, त्यांचा स्वॅब
घेतल्यानंतर दुसऱ्या दिवसापर्यंत त्यांचा अहवाल येत नाही. यामध्ये अनेक कोरोना पॉझिटीव्ह असलेले रुग्णही स्वॅब घेतल्यानंतर किमान 24 तास गावात फिरत राहतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. स्वॅब घेतल्यानंतर जो पर्यंत रुग्णाचा अहवाल निगेटीव्ह येत नाही अशा रुग्णांना घरी जाऊ देऊ नये अशी मागणी जागरूक नागरिक करीत आहेत. रुग्ण पॉझिटीव्ह आल्यानंतरही प्रत्यक्ष दवाखान्यात दाखल होईपर्यंत संबंधित रुग्ण अनेकांच्या संपर्कात येत असल्याने प्रसार वेगाने होत आहे. याकारणाने इगतपुरी, घोटी शहरात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले असल्याची नागरिकांत चर्चा आहे.