देवगांव येथील जंगलात लागली आग : सुदैवाने आदिवासी पाडा वाचला ; असंख्य जीव, वनौषधी आगीत भस्मसात

तुकाराम रोकडे | इगतपुरीनामा न्यूज, दि. २८

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगांव शिवारात आज सकाळी अचानक आग लागली. आगीचे रूपांतर मोठ्या तांडवात होऊन मोठ्या प्रमाणात आदिवासी पाड्यापर्यत आग पोहचली. आदिवासी बांधवांच्या तत्परतेने आटोक्यात आली. सुदैवाने पाड्यापर्यंत पोचलेली आग डोक्यावर पाण्याचे हांडे आणून विझवण्यात आदिवासी बांधवांना यश आले. देवगांव परिसरातील श्रीघाट डोंगरवाडीच्या दरम्यान वनविभागाचे आरक्षित जंगल आहे. जंगलातील वनसंपत्ती टिकून रहावी म्हणून वनविभागाकडून तारेचे कुंपण करण्यात आलेले आहे. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात वाढलेल्या गवतामुळे आग पसरत गेली. सद्यस्थितीत खरीप हंगामपुर्व मशागतीचा म्हणजे राब भाजणीचा हंगाम सुरू आहे. राब भाजणी करताना हवेने आग आटोक्यात न आल्याने, जंगलात वणवा पेटल्याची प्राथमिक माहिती वनविभागाच्या वनरक्षक सुरेखा आव्हाड यांनी दिली.

सकाळी १० ते ११ वाजेच्या सुमारास आग पसरून मोठ्या वणव्यात रूपांतर होऊन वनविभागाने आरक्षित केलेल्या जंगलात जाऊन मोठ्या प्रमाणात आग लागली. आगीची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे संपूर्ण दरी- डोंगर जाळून खाक झाले आहेत. जवळच असलेल्या डोंगरवाडीपर्यंत वणवा आल्याने आदिवासी बांधवांना स्वतःच्या जीवासह पशुधन वाचविण्यासाठी प्रयत्न करावे लागले. डोंगरवाडी येथे सात ते आठ आदिवासी कुटुंब राहत असून लागलेली आग वाडीतील लोकांनी सामूहिक डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन विझवली. सुदैवाने जीवितहानी टळली. श्रमजीवी संघटनेचे पिंटू झुगरे, पांडू वारे आदी कार्यकर्त्यांनी जीवाची पर्वा न करता आग शमवली.

वणवा पेटला, वन्य प्राण्यांच्या जीवावर उठला ..!
जंगलाला वणवा लागल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. वणवा कसा लागतो, कोण पेटवतो या बाबींवर खल होतो. मात्र, वणव्यामुळे जंगलातील दुर्मिळ वनौषधी, वनस्पती नष्ट होत आहे. ऊष्म्याचे प्रमाण वाढत आहे. नैसर्गिक पानवठे नष्ट होऊ लागले आहेत. वण्यप्राण्यांना भक्ष्य मिळणे कठीण होऊन त्यांचे वास्तव्य, अस्तित्व आणि जीव धोक्यात आले आहेत. त्यामुळे जंगली श्वापदांनी मानवी वस्तीकडे, भक्ष्य शोधण्यासाठी मोर्चा वळवला आहे. त्याचा परिणाम म्हणून, नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण जंगलपट्टी भागात बिबट्या तसेच वाघाने हल्ला केल्याच्या अनेक घटना घडत आहेत. जंगलात दुर्मिळ वनौषधी, वनस्पती, बिबट्यांसह अनेक वन्य प्राणी, पशु आणि दुर्मिळ पक्षी आहेत. जंगलाला आग लागल्याच्या घडत आहेत. त्यामुळे या जंगलात असलेल्या वनसंपदेसह वन्य प्राणी, पशु आणि पक्ष्यांचे जीव धोक्यात आले आहेत. या आगीमुळे डोंगर बोडके होत असुन त्यामुळे या भागात ऊष्म्यातही वाढ झाली आहे. 

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!