इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
कोरोनाचा कहर वाढतच असून इगतपुरी तालुक्यात आज २६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत २०५ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आज घोटी बुद्रुक येथे ९, कांचनगाव येथे ८, टाकेद बुद्रुक येथे ७, पिंपळगांव डुकरा येथे २ असे एकूण २६ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली, अशी माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी ‘इगतपुरीनामा’ ला दिली.
इगतपुरी तालुक्यात कोरोना पसरण्यास बेजबाबदार नागरिक कारणीभूत असून अशा व्यक्तींमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. म्हणून नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.
झपाट्याने कोरोना रुग्ण वाढणाऱ्या नाशिक शहरातून गोंदे दुमाला, वाडीवऱ्हे, इगतपुरी भागात शेकडो कामगार कामासाठी येत असतात. त्यांच्या माध्यमातून इगतपुरी तालुक्यात कोरोनाचा प्रसार होण्यास मोठा हातभार लागत असल्याची नागरिकांत चर्चा आहे. त्या अनुषंगाने संबंधित भागात कडक उपाययोजना सुरू केल्यास कोरोना रोखण्यास मदत होईल असे सर्वत्र बोलले जात आहे.
■ शासनाच्या निर्देशानुसार प्रतिबंधित परिसरात आरोग्य यंत्रणेकडून सर्वांशी समन्वय साधून उत्तम काम केले जात आहे. जास्तीतजास्त तपासण्या करून कोरोना रुग्ण शोधण्याचा प्रयत्न होत आहे. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी कार्यकर्त्या आदींच्या माध्यमातून जनजागृती आणि उपाययोजना सुद्धा सुरू आहेत. हे सर्व सुरू असतांना नागरिकांनी सुद्धा निर्देशांचे उचित पालन करून सहकार्य करणे गरजेचे आहे.
– डॉ. एम. बी. देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी, इगतपुरी