
इगतपुरीनामा न्यूज – भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिकांच्या वास्तविक उत्पादकतेचा अचूक आणि वास्तववादी अंदाज घेण्यासाठी पीक कापणी प्रयोग हेच सर्वात मोठे गमक ठरणार आहे, असा ठाम विश्वास नाशिक विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र माने यांनी व्यक्त केला. इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब येथील शेतकरी बन्सी चव्हाण यांच्या शेतात आयोजित जिरायत भात पीक कापणी प्रयोगाची पाहणी करताना ते बोलत होते. अधिकारी वातानुकुलीत कार्यालयात न बसता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. आज ३ नोव्हेंबर २०२६ रोजी भल्या सकाळी ९ वाजेच्या सुमारास कृषी सहसंचालक रवींद्र माने यांनी माणिकखांब येथील प्रयोगाला भेट दिली. हे शेत अत्यंत दुर्गम भागात असल्याने तेथे वाहनाने पोहोचणे अशक्य होते; मात्र कोणतीही तमा न बाळगता माने यांनी स्वतः सुमारे दीड किलोमीटरची पायपीट करत थेट बन्सी चव्हाण यांचे शेत गाठले. या पायी दौऱ्यादरम्यान त्यांनी परिसरातील पिकांच्या सद्यस्थितीची बारकाईने पाहणी केली आणि दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा थेट बांधावर जाऊन जाणून घेतल्या.
दुष्काळामुळे होणारे पिकांचे नुकसान कसे रोखावे आणि शेतकऱ्यांना या संकटातून कसे बाहेर काढावे, यासाठी त्यांनी उपस्थितांना तांत्रिक मार्गदर्शन केले. “दुष्काळी वर्षात पीक कापणी प्रयोग अत्यंत काटेकोरपणे राबवले गेले पाहिजेत, सध्या पिक विमा हा पिक कापणी प्रयोगातील येणाऱ्या उत्पन्नाच्या आधारेच ठरवला जातो .” असे महत्त्वपूर्ण वक्तव्य माने यांनी यावेळी केले. या प्रत्यक्ष पाहणी व पर्यवेक्षणावेळी इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, मंडळ कृषी अधिकारी राजेंद्र काळे, उप कृषी अधिकारी महेश वामन, सहाय्यक कृषी अधिकारी रावसाहेब जोशी, मोनिका गिलांडे यांच्यासह पोलीस पाटील उत्तम पगारे, प्रगतशील शेतकरी हर्षचंद्र चव्हाण, गोविंद चव्हाण, कुंडलिक भटाटे, शांताराम चव्हाण आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.