जय जय महाराष्ट्र माझा या गीताचे तब्बल अठ्ठावीस बोलीभाषांमध्ये अनुवाद : ‘माझी मायबोली’ समूहाकडून ऑनलाईन फ्लिपबुकची निर्मिती

इगतपुरीनामा विशेष : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कवी राजा नीलकंठ बढे यांनी रचलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताचे राज्यातील विविध भागात बोलल्या जाणाऱ्या स्थानिक बोली भाषांमध्ये अनुवाद केलेल्या फ्लिप बुक इ-पुस्तकाचे महाराष्ट्र दिनी ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले. चाळीसगाव येथील प्राथमिक शिक्षक नितीन खंडाळे यांनी राज्यभरातील विविध बोलीभाषेतील अनुवादकांना सोबत घेऊन हा उपक्रम सुरू केला आहे. विविध कवितांचे महाराष्ट्रातल्या स्थानिक बोलीभाषांमध्ये अनुवाद या उपक्रमाच्या माध्यमातून होत आहेत. काल महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जय जय महाराष्ट्र माझा या कवितेचा अठ्ठावीस बोलीभाषांमध्ये भावानुवाद करण्यात आला. राज्याच्या ठिकठिकाणच्या तब्बल अठ्ठावीस स्थानिक बोली भाषांमध्ये या महाराष्ट्र गीताचे पुस्तकरूपात अनुवाद होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ आहे.

मायबोलीतील शब्दात संस्कृती आणि निसर्ग संवर्धनाचे अर्थ असतात. म्हणूनच मायबोली आणि प्रादेशिक बोली राज्यभाषेच्या आधारे टिकल्या आहेत. शब्दांच्या नवनिर्मितीची उपज या बोली भाषांमध्ये असते. जर मायबोली आणि प्रादेशिक बोली नष्ट झाल्या तर राज्य भाषेतील शब्दसाठा कमी होऊन शब्दांची मर्यादा घटू शकते. त्यामुळे स्थानिक, प्रादेशिक, मायबोलींचे विशिष्ट महत्त्व आहे. म्हणून मायबोलींचा अभ्यास तसेच त्यांच्या शब्दसंग्रहांचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचे माझी मायबोली या अनुवाद समूहाचे संचालक नितीन खंडाळे, रोहिदास डगळे, काकासाहेब वाळुंजकर यांनी यावेळी सांगितले.

या पुस्तकात बोली भाषांमध्ये अनुवाद हौशी अनुवादकांनी पुढे येऊन केले आहेत. त्यात अहिराणी बोली- नितीन खंडाळे, बागलाणी अहिराणी बोली- वैभव तुपे, लेवा गनबोली- डॉ. प्रशांत धांडे, तावडी बोली- डॉ. प्रकाश सपकाळे, आदिवासी तडवी भिल्ल बोली- रमजान तडवी, वऱ्हाडी बोली- अरविंद शिंगाडे, मराठवाडी बोली- डॉ. बालाजी इंगळे, नगरी बोली – काकासाहेब वाळूंजकर, पंढरपुरी बोली – कृष्णा कांबळे, चंदगडी बोली- नंदकुमार मोरे, बंजारा गोरबोली- एकनाथ गोफणे, परदेशी बोली- विजयराज सातगावकर, खानदेशी लेवा गुजर बोली- ममता पाटील, पोवारी बोली- रणदीप बिसने, झाडीबोली- पालीकचंद बिसने, डांगी बोली- भावेश बागुल, डांगाणी बोली रोहिदास डगळे, मानकरी बोली – विठ्ठल निरवारे, राठवी पावरी बोली- अमित डुडवे, बारली पावरी बोली- संतोष पावरा, आदिवासी मावची बोली- हर्षदा पराडके, आदिवासी ठाकर बोली- सोमनाथ उघडे, वारली बोली- राजन गरुड, मालवणी बोली- मेघना जोशी, आगरी बोली- तुषार म्हात्रे, दखनी बोली- डी. के. शेख, सामवेदी कोकणी बोली- जोसेफ तुस्कुनो, वाडवळी बोली- स्टॅन्ली गोन्सालविस, हिंदी अनुवाद – काकासाहेब वाळुंजकर तर इंग्रजीतील अनुवाद सुनीता उबाळे पठाडे यांनी केला आहे.

ऑनलाईन फ्लिपबुक साठी लिंक
https://online.pubhtml5.com/efcy/vyod/#p=4

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!