देण्यातला आनंद लुटणारे कदम गुरुजी !

अकोले येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये भास्करराव कदम गुरुजी यांचा अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला आहे. त्यानिमित्त हा शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते भाऊसाहेब चासकर यांनी लिहिलेला विशेष लेख इथे देत आहोत….

शतेषु जायते शूरः सहस्त्रेषु च पण्डितः।
वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवति वा न वा॥
शूरवीर असा मनुष्य शंभरातून एखादा जन्मतो, विद्वान मनुष्य हजारातून एखादा, उत्कृष्ट वक्ता दहा हजारांतून एखादा जन्मतो. मात्र दातृत्वाची संवेदना असणारा दाता हा क्वचितच मिळतो. दातृत्व हा गुण दुर्मिळ असल्याचं वास्तव हे सुभाषित मोजक्या शब्दात मांडतं.

‘माझं ते माझं आणि तुझं तेही माझं’ अशी इतरांचे धन ओरबाडणारी हडेलहप्पी वृत्ती समाजात बळावलेली असतानाच्या काळात कदम गुरुजी आपला हात आखडता न घेता भरभरून देत आहेत. आजवर त्यांनी तब्बल ५० लक्ष रुपयांहून अधिक दान दिलं आहे. त्यातून काही शाळा उभ्या राहिल्या, मंदिरं आकाराला आली. समाजोपयोगी कामांना गुरुजींनी सातत्यानं हातभार लावला. गुरुजी आयुष्यभर ते शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत होते. अकोले येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत त्यांचं शिक्षण झालं. त्याच शाळेत शिक्षक म्हणून ते रुजू झाले. कमलताई यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. त्यादेखील शिक्षकी पेशात कार्यरत होत्या. तब्बल ३६ वर्षे शिक्षक म्हणून शिक्षणसेवा केल्यानंतर दोघेही निवृत्त झाले. मूलबाळ नसल्याचं शल्य त्यांना आत कुठंतरी बोचत असावं. कुटुंबात मूल बाळ नसल्याचं दु:ख करत न बसता त्यांनी विविध शाळांतील मुलांना आपली मुलं मानून त्याचं शिक्षण सुकर व्हावं, यासाठी दानयज्ञ सुरु केला. अकोले शहरातील मॉडर्न हायस्कूलमध्ये भौतिक सोयीसुविधा उभारण्यासाठी गुरुजींनी २५ लक्ष रुपयांचे भरीव आर्थिक योगदान दिले. भव्य सांस्कृतिक सभागृह उभे राहिले आहे. शिक्षणाच्या यज्ञात दानाची आहुती अर्पण करणाऱ्या कदम गुरुजींचे नाव ज्युनिअर कॉलेजमधल्या विज्ञान शाखेला देऊन हिंद सेवा मंडळाने कृतज्ञता व्यक्त केली आहे.

अकोले येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला जोडून सुरु केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेला गुरुजींनी अकरा लक्ष रुपयांची मोठी मदत केली. त्यांच्या या देणगीतून मरणकळा आलेल्या एका शाळेचे पुनर्निर्माण होण्यास चालना मिळाली. शंभराहून अधिक मुलं आज या शाळेच्या अंगाखांद्यावर खेळत आहेत, याचं मोठं श्रेय कदम गुरुजी आणि कमलताई यांना जातं. तेथील पूर्व प्राथमिक शाळेला गुरुजींचं नाव दिलं आहे. विशेष हे की गुरुजींचं नाव द्यावं असा त्यांचा अजिबात आग्रह नव्हता. समाजात चांगलं काहीतरी घडावं, याची वाट बघणारे लोक खूप आहेत. समाजात चांगलं काहीतरी घडवण्यासाठी सर्वार्थानं पुढाकार घेणारी प्रजात दुर्मिळ होत आहे. गुरुजींच्या या विलक्षण योगदानाची नोंद घेऊन समाजासमोर एक उदाहरण ठेवण्याच्या उद्देशानं अकोल्यातील पूर्व प्राथमिक शाळेला गुरुजींचं नाव दिलं आहे. गुरुजींनी कारखाना रस्त्यावरील कारवाडी शाळेला स्वत:च्या मालकीची वीस लक्ष रुपये किमतीची जमीन त्यांनी दान केली. प्रार्थना स्थळं, मंदिरं उभारण्यासाठी गुरुजी देत राहिले. ‘आमच्या शाळेतल्या मुलांना बसायला बेंचेस नाहीत,’ असं सुगावच्या शिक्षकांनी सांगितलं. गुरुजींनी मुलांना बसायला बेंचेस दिले. अन्न दान तर कित्येक ठिकाणी केलं. अगस्ती विद्यालयाच्या इमारतीच्या कामासाठी गुरुजींनी सढळ हातानं मदत केली. गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी असो की त्यांना शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी गुरुजींनी हिशेब केला नाही. हात आखडता घेतला नाही! गुरुजींच्या पत्नी कमलताई हातात हात पकडून या दानयज्ञात सहभागी झालेल्या आहेत. दान सत्पात्री लागले पाहिजे, याकडे त्यांचा कटाक्ष असतो.

दुर्दैवानं आज शालेय शिक्षण असो की उच्च शिक्षण हा धोरणकर्त्यांच्या प्राधान्यक्रमाचा विषय नाही. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान मिळत नाही. शाळांना अमुकतमुक भौतिक सुविधा असल्या पाहिजेत, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, संरक्षक भिंत असली पाहिजे, असे आदेश सरकार काढते. निधी मात्र देत नाही. अशा वेळी शाळा आणि संस्थाचालकांची मोठी पंचाईत होते. तेव्हा कदम गुरुजींसारख्या दानशूर व्यक्तींचा शाळांना मोठा आधार वाटू लागतो. गुरुजी या शाळांकडे आपलं ‘विस्तारित कुटुंब’ म्हणून बघतात.

आजकाल शाळेतल्या मुलांना चार कंपास पेट्या, दहा वह्यांचं वाटप केलं किंवा दोन झाडं लावली तरी वेगवेगळ्या कोनांतून सेल्फी, फोटो, व्हिडिओ तयार करून समाजमाध्यमांत प्रसारित करायचा नवा ट्रेंड आला आहे. गुरुजी मात्र यापासून कोसो योजने दूर आहेत. ‘माझ्याजवळ जे काही होतं ते जणू माझं नव्हतंच. समाजाच्या अंगाखांद्यावर खेळत मोठा होत मी ते मिळवलं, म्हणून ते माझं होत नाही. जे माझं नाही, ते मी दिलं असं म्हणणं चुकीचं होईल. समाजाचं होतं ते समाजाला देता आलं, अशी थोर संधी मिळाली हे माझं परमभाग्य. उपकार नव्हे तर मी कर्तव्य भावनेतून हे सगळं केलं आहे.’ मोठं दान करूनही ‘इदम् न मम’ अशा त्रयस्थ वृत्तीनं ते याकडं बघतात. कशाचाही अभिमान नाही. अहंकाराचा वारा त्यांच्या मनाला कधी शिवला नाही. कुठं कशाचा डंका वाजवला नाही की कशाची जाहिरात केली नाही. देण्यातला, त्यागातला संतोष त्यांना महत्त्वाचा वाटत आला आहे. ‘दान करताना आपण काहीतरी जगावेगळे करत आहोत, असा कोणाताही भाव मनात न आणता, अभिनिवेश न आणता कार्य केले तर यातून मिळणारा आनंद हा शब्दांत व्यक्त करणे अशक्य असते.’ असं कदम गुरुजींचं म्हणणं. म्हणूनच हा निरलस वृत्तीचा निर्मोही माणूस अनेक विद्यार्थ्यांचं शिकणं आणि जगणं सुकर करताना देण्यातलं सुख काय असतं, याचा उच्च कोटीतला आनंदानुभव घेत राहिला!

आयुष्याला उधळीत जावे, केवळ दुसऱ्यापायी
त्या त्यागाच्या संतोषाला, जगी या उपमा नाही
जन्म असावा देण्यासाठी, एकचि मनाला ठावे
कवितेतील या ओळींचा खराखुरा अर्थ कळलेला आणि तो जगण्यात आणलेला माणूस आहे कदम गुरुजी! ऐपत असूनही दानत नसलेल्या श्रीमंतांना कदम गुरुजींसारख्या देणाऱ्या माणसाचे हात लाभोत, देण्याची वृत्ती वृद्धिंगत होवो, अशी अपेक्षा. गुरुजींना निरामय आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो, हीच सदिच्छा.

भाऊसाहेब चासकर, ९४२२८५५१५१.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!