इगतपुरीनामा न्यूज, दि. ११
इगतपुरी तालुक्यात गेले चार दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. संपूर्ण तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले असून इगतपुरी, घोटी शहरासह ग्रामीण भाग आणि एकूणच संपूर्ण नाशिक जिल्ह्यासह इगतपुरी तालुक्याचे जनजीवन यामुळे प्रभावित झाले आहे. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील आणि इगतपुरी तालुक्यातील सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना उद्या ( दि. १२ ) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी उद्या शक्यतो घराबाहेर पडू नये, पालक वर्गानेही विद्यार्थी घरातच सुरक्षित राहतील याची खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तालुका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
दरम्यान गेले तीन दिवस सुरू असलेला संततधार पाऊस आज तिसऱ्या दिवशीही कायम असल्याने जनजीवन चांगलेच प्रभावित झाले असून ‘लेट पण थेट’ आलेल्या या पावसाने सर्वसामान्यांची चांगलीच तारांबळ उडतांना दिसत आहे. इगतपुरी शहराच्या विविध भागात घरांमध्ये पाणी शिरले असून पाऊस अजूनही सुरू असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.