इगतपुरीनामा न्यूज, दि. ११
इगतपुरी तालुक्यातून उच्च क्षेत्रातील गुणवंत अधिकाऱ्यांची फौज निर्माण करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी कंबर कसली आहे. MPSC आणि UPSC मध्ये अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षेत्रात गगनभरारी घ्यावी यासाठीही गोरख बोडके यांनी संकल्प केलेला आहे. यासाठी इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ह्या गावात २ मजली सुसज्ज अभ्यासिका उभी करण्यात आली आहे. राज्यातील विविध क्षेत्रातील निवृत्त अधिकाऱ्यांचे मौलिक मार्गदर्शन सुद्धा अभ्यासिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी दिले जाणार आहे. अधिकारी बनण्यासाठी अविरत प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पंखात बळ भरणाऱ्या गोरख बोडके यांचे इगतपुरी तालुक्यातून कौतुक केले जात आहे. ह्या अभ्यासिकेच्या माध्यमातून आगामी काळात इगतपुरी तालुक्यातील यशस्वी विद्यार्थी मोठे अधिकारी झाल्याचे मला पाहायचे असल्याचे गोरख बोडके यांनी सांगितले.
इगतपुरी तालुक्यात दुर्गम आणि आदिवासी गावांची संख्या जास्त असून गरीब कुटुंबातील विद्यार्थी सुद्धा जास्त आहेत. आर्थिक परिस्थिती, संधीचा अभाव, अभ्यासासाठी शांततेचे वातावरण आणि संदर्भ ग्रंथ मिळत नसल्याने ह्याचा दुष्परिणाम त्यांच्या गुणवत्तेवर होतो. यामुळे MPSC आणि UPSC परीक्षेत यश मिळायला अडचणी उभ्या राहतात. या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी विद्यार्थ्यांची अडचण सूक्ष्मपणे समजून घेतली. त्यानुसार इगतपुरी तालुक्यातील मोडाळे गावात दोन मजली सुसज्ज अभ्यासिका उभी करण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला. मोडाळे गावासह इगतपुरी तालुक्यातून अधिकाऱ्यांची फौज उभी करण्यासाठी गोरख बोडके यांनी केलेला संकल्प अभ्यासिकेच्या माध्यमातून आकाराला आला आहे. इगतपुरी तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका खुली करण्यात येणार आहे.
अभ्यासिकेमध्ये विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारी विविध पुस्तके आणि विविध संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी विशिष्ट कौशल्य प्राप्त करण्याची संधी याद्वारे मिळणार आहे. राज्यभरातील यशस्वी ठरलेल्या विविध अधिकाऱ्यांसह निवृत्त अधिकाऱ्यांचे मौलिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना वेळोवेळी दिले जाणार आहे. बसण्यासाठी व्यवस्था, निसर्गरम्य वातावरण आणि अनेक पुस्तकांचे सुसज्ज नियोजन विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आगामी काळात इगतपुरी तालुक्यातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमधून मोठे अधिकारी पाहायचा माझा संकल्प पूर्ण झालेला असेल असा विश्वास जिल्हा नियोजन समिती गोरख बोडके यांनी व्यक्त केला आहे. सुसज्ज अभ्यासिका उपलब्ध करून देण्यासाठी गोरख बोडके यांनी केलेले साहाय्य विद्यार्थ्यांना भरारी घेण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. इगतपुरी तालुक्यातून गोरख बोडके यांचे आभार मानण्यात येत असून विविध गावातही असा उपक्रम राबवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.